Sunday, April 18 2021 11:51 pm

पालघर रेल्वे स्थानकावर रिक्षा थेट फलाटावरच घुसवली

पालघर :-  ८५ वर्षीय वृद्धाला अस्वस्थ वाटू लागल्याने रिक्षा चालकाने रिक्षा थेट  फलाटावरच  घुसवल्याचा प्रकार  पालघर रेल्वे स्थानकावर बुधवारी घडला.  त्यानं रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर रिक्षा आणली आणि वृद्धाला घेऊन जवळच्या रुग्णालयात दाखल केलं.
रिक्षा  फलाटावर  घुसवल्या  प्रकरणी रिक्षा चालकाला अटक केली आणि त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.  पिंटू श्रीवास्तव (वय ३४) असं त्याचं नाव आहे. गेल्या महिन्यात सागर गावड या ३४ वर्षीय चालकानं विरार रेल्वे स्थानकात थेट रिक्षा घुसवली होती. एका गरोदर महिलेला तातडीने रुग्णालयात पोहोचवलं होतं. या प्रकरणी त्याला अटक करून जामिनावर सोडण्यात आलं होतं. अशीच घटना बुधवारी दुपारी पालघर रेल्वे स्थानकात घडली. रिक्षाचालक श्रीवास्तव रेल्वे स्थानकाबाहेरच होता. ८५ वर्षीय वृद्धाला अस्वस्थ वाटत असल्याचं एका व्यक्तीनं त्याला सांगितलं. त्यामुळं त्या वृद्धाच्या मदतीसाठी श्रीवास्तव धावून गेला. त्यानं रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर रिक्षा आणली आणि वृद्धाला घेऊन जवळच्या रुग्णालयात दाखल केलं.