Sunday, April 18 2021 10:13 pm

पालघर जिल्ह्यात वीज अंगावर पडून दोघांचा मृत्यू, सहा जखमी

पालघर : जिल्ह्यातील डहाणू व वाडा तालुक्यात आज वीज अंगावर कोसळून तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शिवाय, अन्य सहा तरूण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील तवा येथे वीज अंगावर पडून जितेश तुंबडा (वय २२) या तरुणाचा मृत्यू झाला. तर, अनिल धिंडा (वय २०) हा तरूण जखमी झाला असून त्याच्यावर वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पालघर जिल्ह्यात आज ढगाळ वातावरणानंतर विजेचा कडकडाट सुरू झाला आहे. दरम्यान, डहाणू तालुक्यातील तवा येथील साईबाबा मंदिर येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या दोघांवर वीज पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. यातील एकाचा मृत्यू झाला. तर, वाडा तालुक्यात आज सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावासा दरम्यान वीज अंगावर पडून अंबिस्ते येथील १७ वर्षीय सागर शांताराम दिवा या तरुणाचा मृत्यू झाला. तर त्याच्या सोबतचे अन्य पाच तरुण जखमी झाले आहेत.

वाडा तालुक्यात रविवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता. पावसापासून संरक्षणासाठी हे सर्व तरुण एका झाडाखाली जमा झाले होते. यावेळी सागर शांताराम दिवा या तरुणाच्या अंगावर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. तर, त्याच्या सोबतचे संदिप अंकुश दिवा (वय 25), अनंता चंद्रकांत वाघ (वय 24), रविंद्र माधव पवार (वय18), नितेश मनोहर दिवा (वय 19) व सनी बाळु पवार (वय 18) हे तरूण जखमी झाले. जखमी तरूणांना खानिवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे..