Monday, January 27 2020 3:25 pm

पालकमंत्र्यांनी काढले चिमटे

ठाणे :-  शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीने पालिका आयुक्त संजीव आणि लोकप्रतिनिधीमध्ये झालेल्या वाद मिटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात आले . यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात चांगल्याच कानपिचक्या दिल्या. एकनाथ शिंदे यांच्या आधी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी भाषण करून शहरात सुरु असलेल्या सर्व प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यांतर एकनाथ शिंदे यांनी सर्व प्रकल्पाचा आढावा घेतला असल्याने माझं काम हलके केले असून मातोश्रीवर झालेल्या बैठकीचा उल्लेख टाळत आयुक्तांचे काम देखील मी हलके केले असल्याचा टोला एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला. महापौर सर्व लोकप्रतिनिधी आणि पालिका आयुक्त नेहमीच हातात हात घालून काम करतात मात्र काम करताना कधी कधी थोडी गडबड होत असल्याचे सांगत आता उद्धव ठाकरे यांनी विकासाला प्राधान्य द्या असे सांगत सर्वानाच समज दिली असल्याचे त्यांनी या कार्यक्रमात आवर्जून सांगितले. जितो सारख्या संस्थाकडे लक्ष्मी आहे तर शिवसेनेने अशा संस्थाना संरक्षण दिले . शिवसेनेमुळेचा महाराष्ट्र सुरक्षित असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. क्लस्टरचा एक तरी नारळ फोडा अन्यथा इतर कामांचा देखील काही उपयोग होणार नाही अशा कानपिचक्या देखील त्यांनी आयुक्तांना दिल्या.

आचारसंहिता संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी क्लस्टरचे काम सुरु करणार – पालिका आयुक्त
विधानसभेच्या आचारसंहितेच्या आधी क्लस्टरचा कामाचा एक तरी नारळ फुटेल असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. मात्र लोकांच्या शंका आणि त्रुटी असल्याने या सर्व गोष्टींना विलंब झाला . मात्र जर आचार संहितेपूर्वी जर एका तरी क्लस्टरचा नारळ फोडता आला नाही तर आचार संहिता संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एका तरी क्लस्टरच्या कामाला सुरुवात करण्यात येईल हा प्रशासन म्हणून माझा शब्द असल्याचं पालिका आयुक्तांनी यावेळी घोषणा केली. मातोश्रीवर झालेल्या बैठकी नंतर आयुक्तांच्या वक्तव्यांमध्ये देखील वेगळेना दिसून आले . सभागृहात काम करताना महापौर आणि लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य मिळत असल्याचा आवर्जून उल्लेख पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केला.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आवर्जून उपस्थिती –
शिवसेनेच्या वतीने विविध प्रकारच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा असला तरी,गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या या मुख्य कार्यक्रमात भाजपच्या नेत्यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती . यामध्ये आमदार संजय केळकर, एड. निरंजन डावखरे, भाजपचे गटनेते नारायण पवार, ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर , शहर अध्यक्ष संदीप लेले आणि इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते. त्यामुळे पालिका आयुक्तांच्या विरोधात एकवटलेले भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी विकासकामांच्या मुद्द्यावरहे एकत्र येताना यावेळी दिसले.