Wednesday, April 23 2025 12:30 am

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते जिल्हा परिषद मालमत्ता ई-सर्व्हेक्षण प्रणालीचे उद्घाटन

ठाणे, 15 जिल्हा परिषद ठाणेच्या जिल्हा व क्षेत्रियस्तरावरील एकूण ९,४७७ स्थावर व जंगम मालमत्तांचे सर्व्हेक्षण करून त्यांच्या नोंदी ऑनलाईन स्वरुपात अद्यावत करणे. मालमत्तांच्या केलेल्या नोंदींचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद ठाणे मार्फत ऑनलाईन सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून राज्याचे उत्पादन शुल्क तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ठाण्यातील नियोजन भवन येथे उद्घाटन करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या मालमत्तांवरील अतिक्रमण तसेच न्यायालयीन वाद याबाबतची अद्यावत माहिती उपलब्ध होणे, त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मालमत्तांची ग्रामीण जनतेकरीता विविध सुविधा निर्माण करण्यासाठी तसेच स्वउत्पन्न वाढीसाठी अधिकाधिक वापरात आणण्यासाठी फायदा होणार आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा व लोकल बोर्ड विविध मालमत्तांचे स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय संख्या, क्षेत्रफळ, किंमत, आदीबाबी सहजरित्या माहिती उपलब्ध करण्याच्या उद्देशाने सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) श्री. अविनाश फडतरे यांनी दिली.

जिल्हा परिषद मालमत्तेचे सर्वेक्षण व ऑनलाईन स्वरुपात नोंद संबंधित विभागाचे क्षेत्रियस्तरावरील कर्मचारी त्यांना पुरवण्यात आलेल्या Login ID द्वारे करण्यात येणार आहे. सर्वेक्षण व ऑनलाईन स्वरुपात नोंद केलेल्या नोंदींची खात्री संबंधित विभागाचे पंचायत समितीस्तरील खातेप्रमुख अंतिम करतील व वेळोवेळी सुधारणा करणे देखील शक्य होणार असल्याने अद्यावत माहिती तयार होणार आहे. जिल्हास्तरावरील मालमत्तेचे सर्वेक्षण ऑनलाईन स्वरुपात नोंद बांधकाम विभागामार्फत करण्यात येईल.

जिल्हा परिषद मालकीच्या सर्व मालमत्तांचे एकत्र मास्टर रजिस्टर तयार होईल त्याचा फायदा कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी होईल – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल

जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास मा. आमदार किसन कथोरे, जिल्हाधिकारी मा. अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल, मा. अति मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक (जि.ग्रा.वि.यं) श्रीम. छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) श्री. अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) श्री. प्रमोद काळे, सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.