Thursday, December 5 2024 7:16 am

पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमीपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न

अलिबाग (जिमाका):-माणगाव तालुक्यातील मोर्बा मतदारसंघात राज्यमंत्री तथा रायगड पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते जवळपास 2 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमीपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

यावेळी त्यांच्या हस्ते जावळी अंगणवाडी इमारत, दहिवली तर्फे गोवेले रस्ता, देगाव जोड रस्ता, महादपोली आदिवासी वाडी अंगणवाडी इमारत, मोर्बा अंतर्गत रस्ता, मोर्बा येथे साकव, सुर्ले आदिवासीवाडी अंगणवाडी इमारत या कामांचे उदघाटन तर गट ग्रामपंचायत लोणशी नवीन कार्यालयाचे लोकार्पण संपन्न झाले.

याशिवाय ग्रामपंचायत कुमशेत कार्यालय, शिरवली तर्फे गोवेले जोडरस्ता, ढाकशेळी अंतर्गत रस्ता, मोर्बा डोंगरोली महादपोली बौद्धवाडी रस्ता, मोर्बा देगाव रस्ता, मोर्बा कब्रस्थान शेड, मोर्बा दरगाह विहिरीकडे जाणारा रस्ता या कामांचे भूमीपूजनही पार पडले.

यानंतर मोर्बा मॉडर्न स्कूल येथे झालेल्या जाहीर सभेच्या वेळी पालकमंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, मोर्बा मतदारसंघाचे तसेच माणगाव तालुक्याचे तटकरे कुटुंबावर नेहमीच प्रेम राहिले आहे. लोकसभा निवडणुकीवेळी मोर्बा मतदारसंघातून जनतेने खासदार सुनिल तटकरे यांना भरभरून मतदान दिले. मोर्बा तलाव सुशोभिकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. मॉडर्न इंग्लिश स्कूलसाठी आमदार निधीतून लॅब साहित्यही नजीकच्या काळात देण्यात येणार आहे. लोणशी ग्रामपंचायत कार्यालय इमारत अतिशय देखणी असून पुढील काळात होणाऱ्या ग्रामपंचायत इमारती पण अशाच उभ्या करण्यात याव्यात. लोणशी ग्रामपंचायत पुढच्या वर्षी 50 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने येथील आरोग्य केंद्राला लागणारा आवश्यक निधी लवकरात लवकर उपलब्ध करून तात्काळ कामही सुरू करण्यात येईल.

या कार्यक्रमाला सुभाष केकाणे, इकबाल धनसे, शेखर देशमुख,दिपक जाधव, संगिता बक्कम, माणगाव पंचायत समिती सदस्य अलका केकाणे, अब्दुल्ला गंग्रेकर, उणेगाव सरपंच राजेंद्र शिर्के, काका नवगणे, बालाभाई सनगे,मुकुंद जांबरे, श्रध्दा यादव, इकबाल हर्णेकर, भोरावकर गुरुजी, गटविकास अधिकारी श्री.प्रभे, नायब तहसिलदार श्रीमती भाबड, शादाब गयबी, राजू मोरे आदींची उपस्थिती होती.