ठाणे 29 – ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात पारसिक नगर परिसरासाठी निर्देशित केलेले राखीव भूखंडांवर नागरी सोयीसुविधा निर्माण करुन ते नागरिकांसाठी खुले करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री,आ. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे.
पारसिक नगर परिसरामध्ये नागरी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात काही राखीव भूखंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. पारसिक नगर हा परिसर ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास आराखड्याद्वारे संपूर्ण अधिकृत वसाहत म्हणून गणला गेला आहे. या परिसराचे सौंदर्य जपणे आवश्यक आहे. या परिसरामध्ये नागरिकांसाठी मार्केट, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,खेळाचे मैदान, परिसरातील मुलांसाठी शाळा, सुसज्ज नाट्यगृह, बालोद्यान व उद्यान, शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय व विरंगुळा केंद्र आदी सुविधा ठामपाच्या विकास आराखड्यामध्ये नमूद करुन येथील भूखंड राखीव ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात पारसिक नगर परिसरासाठी राखीव असलेल्या भूखंडावर नागरी सोईसुविधा प्राधान्यक्रमाने उपलब्ध द्याव्यात, अशी मागणी डॉ. आव्हाड यांनी केली आहे.