Tuesday, July 23 2019 2:28 am

पाणी प्रश्नावऋण नगरसेविकेचा आत्महत्याचा प्रयत्न

भिवंडी-: शहरातील साठेनगर या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना पुरेसे मुबलक पाणी मिळत नाही. यामुळे भाजपच्या स्थानिक नगरसेविका साखराबाई बगाडे यांनी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे गेल्या दोन महिन्यापासून तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याकडे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुलर्क्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या नगरसेविका बगाडे यांनी सोमवारी दुपारच्या सुमाराला महासभेत हा विषय मांडत सभेचा निषेध केला. त्यानंतर त्यांनी पालिकेच्या सातव्या मजल्यावर धाव घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना तेथेच अडवून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले. अचानक त्यांनी टोकाची भूमिका घेतल्याने त्यांची तब्बेत बिघडली. त्यांना  स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी  दाखल करण्यात आले आहे. सत्ताधारी काँग्रेस पक्ष नागरिकांना सुविधा देण्यास अयशस्वी ठरला आहे. यामुळे भाजप  नगरसेवकांनी या घटनेचा निषेध केला. शहरातील देवजी नगर परिसरात मागासवर्गीय व कामगारांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साठेनगर या भागात पालिका प्रशासनाने गेल्या चार वर्षात कोट्यवधी रुपयांच्या पाणी पुरवठा योजना राबवल्या आहेत. मात्र, त्यातील बहुसंख्य योजना कागदावर असल्याने परिसरातील रहिवाशांना  पुरेसे पाणी मिळत नाही. या बाबत भाजपच्या नगरसेविका साखराबाई बगाडे  यांनी वेळोवेळी  लेखी तक्रारी करून पाणी मिळावे अशा मागण्या  केल्या आहेत.