Sunday, April 18 2021 10:40 pm

पश्चिम बंगाल, तमिळनाडूसह 5 राज्यांतील निवडणुकीचे बिगूल वाजले; 27 मार्चपासून मतदान, 2 मे ला निकाल, WB मध्ये 8 टप्प्यात मतदान

नवी दिल्ली : आसाम, तमिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज (शुक्रवार) दिली. पश्चिम बंगालमध्ये 8, आसाममध्ये 3 टप्प्यात मतदान होणार आहे. तर तमिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरीत फक्त एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

दिल्ली येथील विज्ञान भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सुनील अरोरा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, या सर्व राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यवेक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे. आसाम, तमिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल आणि पुदुच्चेरी या राज्यांतील विधानसभेच्या एकूण 824 जागांसाठी निवडणूक घेतली जात आहे. त्यासाठी 18 कोटींपेक्षा जास्त मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यांत मतदान

पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामध्ये पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 1 एप्रिल हा असेल. तर तिसरा टप्प्यात 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल हा असणार आहे. याशिवाय पाचवा टप्पा 17 एप्रिल, सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिल आणि शेवटचा आठवा टप्पा 29 एप्रिल हा असणार आहे. याचदरम्यान पश्चिम बंगालमध्ये मतदान घेतले जाणार आहे. तर याचा निकाल 2 मेला जाहीर केला जाणार आहे.
आसाममध्ये 3 टप्प्यांत होणार मतदान
आसाम राज्यात एकूण 3 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामध्ये पहिला टप्पा 27 मार्चला असणार आहे. तर दुसरा टप्पा एक एप्रिलला होणार तर तिसरा टप्पा 6 एप्रिलला होणार आहे. तर या मतदानाची मोजणी 2 मेला होणार आहे.

केरळ, तमिळनाडू, पुदुच्चेरीत एकाच टप्प्यात मतदान

केरळमध्ये एकाच टप्पात 6 एप्रिलला मतदान होणार आहे. तर तमिळनाडूत 6 एप्रिलला मतदान होणार आहे. याशिवाय पुदुच्चेरीत 30 जागांसाठी एकाच टप्प्यात 6 एप्रिलला मतदान होणार आहे.