Saturday, August 24 2019 11:39 pm

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार दीदींनीच घडवला; अमित शहा

कोलकाता :-  पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी झालेल्या हिंसाचाराला  केवळ तृणमूल काँग्रेस जबाबदार आहे, अशा शब्दांत भाजपा अध्यक्ष अमित शहांनी तृणमूलवर आरोप लावला. आम्ही देशभरात निवडणूक लढवली. पण तिथे हिंसाचार झाला नाही. कारण तिथे तृणमूल नाही. फक्त पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला. कारण केवळ याच राज्यात तृणमूल सत्तेत आहे, अशी टीका अमित  शहांनी केली. काल शहांच्या कोलकात्यातील रोड शोमध्ये मोठा हिंसाचार झाला. त्यामुळे भाजपाला रोड शो अर्धवट सोडावा लागला. यानंतर आज शहांनी पत्रकार परिषद घेत तृणमूलवर शरसंधान साधलं.

काल  संध्याकाळी भाजपाचा रोड शो होता.  त्याआधी तृणमूलच्या गुडांनी भाजपाचे पोस्टर फाडले. पण पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. निवडणुकीपूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. पश्चिम बंगालमध्ये तशी कोणतीही कारवाई झाली नाही. निवडणूक आयोगानंदेखील यावर आक्षेप घेतला नाही. आयोगाची ही भूमिका दुटप्पी आहे,’ अशा शब्दांत शहा बरसले.
अमित शहांनी पत्रकार परिषदेत तृणमूलसह राज्यातील निवडणूक आयोग आणि पोलिसांवर जोरदार हल्ला चढवला. ‘तृणमूल काँग्रेसला पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळेच आता भाजपाला रोखण्यासाठी हिंसेचा वापर होत आहे

पश्चिम बंगालमधील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. मात्र राष्ट्रपती शासनाची आवश्यकता नाही. हे शासन जनताच संपवेल, असं अमित शहा म्हणाले. ‘अमित शहा काही देव नाहीत, असं ममता बॅनर्जी म्हणतात. दीदी, मी स्वत:ला देव समजत नाही. पण तुम्हीही समजू नका. कालच्या रॅलीत हिंसाचार झाला. अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या. पण हिंसाचाराचा जितका चिखल फेकाल, तितकं कमळ जोमानं फुलेल, हे दीदींनी लक्षात ठेवावं’ असं शहा यांनी म्हटलं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा महाविद्यालयातला पुतळादेखील तृणमूलच्या गुंडांनी मोडल्याचा आरोप त्यांनी केला. संध्याकाळी सात वाजता महाविद्यालयातल्या पुतळ्याची कशी काय मोडतोड होते? बंद झालेलं महाविद्यालय कसं काय उघडलं जातं? महाविद्यालयाच्या चाव्या कोणाकडे आहेत?, असे प्रश्न शहांनी उपस्थित केले.