मुंबई, 25 : पर्यटन क्षेत्रात जागतिक दर्जाची कौशल्य प्राप्त व्हावीत म्हणून शासन भर देत असून पर्यटन मध्ये कौशल्य विकासाच्या विविध योजना आणल्या जात आहेत, असे पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी सांगितले.
राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत 20 ते 28 जानेवारी दरम्यान ‘मुंबई फेस्टिव्हल 2024’ आयोजित केला आहे. या महोत्सवामध्ये बुधवार, 24 जानेवारी रोजी बीकेसी येथील हॉटेल ग्रॅण्ड हयात येथे पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ‘पर्यटनाच्या शाश्वत विकासासाठी पर्यटन कौशल्य विकसित करणे’ या दुपारच्या चर्चासत्रात पर्यटन संचालक डॉ. पाटील बोलत होते. यामध्ये इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटचे मोहम्मद अख्तर, ईटीचे आशुतोष सिन्हा यांचा सहभाग होता.
‘पर्यटनाच्या शाश्वत विकासासाठी पर्यटन कौशल्य विकसित करणे’ या चर्चासत्रात शाळा, महाविद्यालय आणि खासगी संस्था त्याचबरोबर शासनाच्या समन्वयातून पर्यटनासाठी कुशल मनुष्यबळ विकसित तयार करण्यासाठी काम होणे गरजेचे आहे. शासनाची भूमिका ही पर्यटनामध्ये नाविन्यपूर्ण कौशल्य विकसित करण्यासाठी सकारात्मक आहे. शासनाच्या विविध योजना या पर्यटनाला प्रोत्साहन देणाऱ्या असल्याचे मत पर्यटन संचालक डॉ. पाटील यांनी व्यक्त केले.
‘महाराष्ट्राचे ग्रामीण पर्यटनाचे व्हिजन’ या विषयावर केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या अधिकारी कामाक्षी माहेश्वरी यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी स्थानिक संस्कृती लक्षात घेऊन अनेक योजना राबवल्या जात आहेत.शासनाच्या योजनांची माहिती केंद्राच्या www.rural.tourism.com या संकेतस्थळावरती पाहायला मिळेल, असे त्यांनी सांगितले.
‘पर्यावरण पूरक पर्यटनाला चालना देणे’ या विषयावरील चर्चासत्रामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी शर्मा, संचालक, शाश्वत क्लांयट सॉल्यूशेनच्या उमित भाटिया, सर्व्हिस क्वालिटीचे अध्यक्ष अब्राहम अलपट्टा यांचा सहभाग होता. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी शासन अनेक उपक्रम राबवत आहे.महिलांसाठी अनेक पॅकेजेस जाहीर केलेली आहेत. महिला उद्योजक आणि महिलांचा पर्यटन क्षेत्रात सहभाग वाढावा यासाठी ‘आई ‘ पर्यटन धोरण राबवण्यात येत असल्याचे श्रीमती जोशी यांनी सांगितले. इतर मान्यवरांनी शाश्वत पर्यटन विकासासाठी शासन आणि खाजगी उद्योजकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे याबद्दल मते व्यक्त केली.
‘जागतिक पर्यटनातून महाराष्ट्र काय शिकेल’ या विषयावरील चर्चा सत्रामध्ये लेझर ट्रॅव्हल्सचे प्रादेशिक प्रमुख हिमांशु संपत, एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, स्टर्लिंग हॉलिडेजचे अधिकारी अनुपमा दत्ता, प्लॅटिनम मॉडिरेटचे व्यवस्थापकीय संचालक बिरजू गरीबा यांनी सहभाग घेतला.