Wednesday, July 16 2025 12:07 am

परिवहन बसेसच्या मार्गाचे सर्वेक्षण करून जलद व सुखकर सेवा देण्यासाठी प्रयत्न करावेत – आयुक्त अभिजीत बांगर

*आयुक्तांनी घेतला परिवहनच्या कामकाजाचा आढावा*

ठाणे, (01) ठाण्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम व नागरी कामे हाती घेण्यात आले आहे. प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियानातंर्गत सुरू कामे सुरू आहेत. याच धर्तीवर ठाणे परिवहन सेवा अधिक सक्षम करुन आवश्यकतेनुसार बदल करुन प्रवाशांना जलद व सुखकर सेवा मिळेल या दृष्टीने परिवहन सेवेचा आढावा आज झालेल्या बैठकीतआयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला. तसेच नव्याने उपलब्ध होणाऱ्या इलेक्ट्रिक बसेसच्या पुरवठा कामात विलंब होत असल्याबाबत संबंधित ठेकेदारास नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.

परिवहन सेवा ठाणेकरांची जीवनवाहिनी आहे, ही बससेवा केवळ ठाणे शहरापुरतीच मर्यादित न राहता बोरिवली, मीरारोड, भिवंडी, मुलुंड, कल्याण आदी भागात पोहचली आहे. तसेच आरामदायी प्रवासासाठी परिवहनच्या ताफ्यात वातानुकूलित बसेस देखील धावत आहेत. परिवहन सेवेच्या माध्यमातून सद्यस्थितीत सुरू असलेले मार्गावरील बसफेऱ्यांची माहिती आज झालेल्या बैठकीत आयुक्तांनी जाणून घेतली. ज्या मार्गावर बसेस धावत आहेत त्याचा संपूर्ण आढावा घेवून गर्दीच्या वेळी जास्तीत जास्त उपलब्ध होवून प्रवाशांचा खोळंबा होणार नाही व प्रवाशी परिवहनच्या बसेसला प्राधान्य देतील या दृष्टीने संपूर्ण सर्व्हेक्षण करुन आवश्यक ते बदल व उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना आयुक्त श्री. बांगर यांनी दिल्या.

पर्यावरणपूरक म्हणून परिवहन सेवेने इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून सदर कामाचा ठेका ओलेक्ट्रा या कंपनीस देण्यात आला आहे. यामध्ये एकूण 123 बसेसचा समावेश असून आजवर केवळ 13 बसेस परिवहनच्या ताफ्यात दाखल झालेल्या आहेत. परंतु उर्वरित एकूण 110 बसेस पुरवठ्याबाबत संबंधित ठेकेदारांकडून विलंब होत असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त संबंधित ठेकेदारास करारनाम्याप्रमाणे दंड लावण्यात यावा, तसेच त्यानंतरही वेळेत बसेसचा पुरवठा केला नाही तर भविष्यातील निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यापासून प्रतिबंधित का करु नये याचा खुलासा मागवून घ्यावा व आवश्यकता पडल्यास ही कार्यवाही कायम करावी अशा सूचना आयुक्त श्री. बांगर यांनी दिल्या. तसेच परिवहनमार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजना व बदलाबाबत वेगवेगळ्या ठिकाणी प्रवाशांची मते जाणून घ्यावीत जेणेकडून त्यांच्याकडून येणाऱ्या सुचनांनुसार आपल्याला कोणते बदल करणे गरजेचे आहे हे समजू शकेल व त्याप्रमाणे आपण बदल करु असेही त्यांनी या बैठकीत नमूद केले.

बसेसच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी 11 वेळा निविदा मागवून देखील योग्य प्रतिसाद मिळाला नाही ही बाब अत्यंत खेदजनक आहे तरी याबाबत एनएमएमटी, बी.एस.टी यांच्या जाहिरातदारांशी तुलना करुन दर निश्चित करावेत व निविदा अधिक स्पर्धात्मक होईल अशा पध्दतीने अटी शर्थीमध्ये बदल करावा जेणेकरुन निविदा यशस्वी होवू शकेल अशाही सूचना या बैठकीत देण्यात आल्या. महापालिकेच्या आस्थापनेवर परिवहनकडून ज्या 56 चालकांची सेवा वर्ग करण्यात आली आहे, अशा वाहनचालकांची सेवा टप्याटप्याने पुन्हा परिवहन सेवेत दाखल करुन घ्यावे असेही निर्देश आयुक्त श्री. बांगर यांनी दिले.

परिवहन सेवेत काम करताना दोन प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. परिवहन सेवेत अशा पध्दतीने सुधारणा कराव्यात की नागरिकांना सुखद अनुभव प्राप्त होईल. तसेच परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीकोनातूनही सकारात्मक कार्यवाही होईल्‍ या दृष्टीने कामकाज करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.

घोडबंदररोड सारखे लांबपल्ल्याचे व गर्दीचे मार्ग या ठिकाणी बसेसच्या फेऱ्या वाढवाव्यात त्याचबरोबर नवीन येणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस प्राधान्याने उपलब्ध करुन द्याव्यात. परिवहन सेवा वापरणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून त्यांना येणाऱ्या अडचणी व उपक्रमाकडील त्यांच्या अपेक्षा याबाबत फीडबॅक घेवून त्यांच्या सूचनांचा अंतर्भाव आपल्या सेवेत होईल याची दक्षता घ्यावी. महिलांना परिवहन सेवेचा लाभ विनासायास घेता येईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले.

*परिवहन सेवा आर्थिकदृष्टया स्वयंपूर्ण होण्यासाठी जमिनींचा विकास*

परिवहन उपक्रमाच्या मालकीच्या अनेक जमिनी मोक्याच्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी या जमिनीचा विकास परिवहन विभागाच्या गरजा भागाविण्यासोबतच वाणिज्य पध्दतीने केला तर त्यातून कायमस्वरुपी मोठा उत्पन्न स्त्रोत निर्माण होवू शकेल, त्यासाठी आनंदनगर डेपो पासून सुरूवात करुन त्या जमिनीचा विकास करण्यासाठी ट्रान्झॅक्शन ॲडव्हायझर नियुक्त करण्यात यावेत व त्यांच्या माध्यमातून निविदा बनविण्याचे काम सुरू करण्याचे निर्देशही श्री. बांगर यांनी दिले.

*परिवहन बसचे ॲप नागरिकांपर्यत पोहचवावे*

तसेच मध्यंतरीच्या काळात परिवहन सेवेने प्रवाशांच्या सोईसाठी ॲप सुरू केले आहे, परंतु या ॲपला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास येत आहे, किंबहुना अनेक प्रवाशांना माहिती देखील नाही हे दुर्देवी आहे, तरी याची गंभीर दखल घेवून सदर ॲपमध्ये आवश्यक ते बदल करावेत व नागरिकांना सुविधाजनक बदल करुन जास्तीत जास्त प्रवाशांपर्यत ॲप पोहचेल या दृष्टीने कार्यवाही करावी असेही आयुक्तांनी नमूद केले.

या बैठकीस परिवहन सभापती विलास जोशी, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे आदी उपस्थित होते.