Wednesday, February 26 2020 8:11 am

पनवेल मनपा क्षेत्राच्या ग्रामपंचायतीतील ३२० कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेणार राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांचा पुढाकार

मुंबई : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या ३२० कर्मचाऱ्यांना पनवेल महापालिकेच्या सेवेत एका महिन्यात समाविष्ट करून घेण्याचे आश्वासन नगरविकासमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

मंत्रालयात पनवेल मनपाक्षेत्रातील ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्यमंत्री तथा पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या पुढाकाराने बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी नगरविकासमंत्री ना. एकनाथ शिंदे बोलत होते. बैठकीस आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर व पनवेल कर्मचारी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील ग्रामपंचायतींचे महानगरपालिकेच्या हद्दीत समावेश झाला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये वर्षानुवर्षे काम करत असणाऱ्या ३२० कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. याची दखल घेऊन त्यांना पनवेल महानगरपालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी यावेळी केली होती त्यावर या कर्मचाऱ्यांना महिन्याभरात सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन ना. शिंदे यांनी यावेळी दिले.

महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा याबाबत कर्मचारी संघटनेमार्फत निवेदन देण्यात आले त्यावर शासन सकारात्मक निर्णय घेईल असेही ना. शिंदे यांनी यावेळी सांगितले.