Wednesday, August 12 2020 8:45 am

पनवेलच्या मनसे पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या ३ आरोपींना अटक

पनवेल – पनवेल मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विजय चिपळेकर यांनी त्यांच्या ७ ते ८ गुंड साथीदारांसह प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेने मयूर चिपळेकर, किरण सोलंकर, तेजस म्हात्रे या ३ आरोपींना अटक केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांना मारहाण प्रकरणी कामोठे पोलीस स्थानक येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. परंतु राजकीय दबावाखाली तपास सुरू आहे असे दिसताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवी मुंबई पोलीस आयुक्त संजीव कुमार यांची भेट घेत हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची मागणी केली. गुन्हे शाखेकडे प्रकरण गेल्यानंतर तपासाला वेग आला.

विजय चिपळेकर आणि त्यांच्या साथीदारांनी अलिबाग कोर्टात पुन्हा एकदा जामीनासाठी अर्ज केला मात्र अलिबाग कोर्टाने फेटाळला. त्यानंतर काल रात्री पुण्याला पळून जाण्याचा तयारीत असणाऱ्या मयूर चिपळेकर, किरण सोलंकर, तेजस म्हात्रे यांना नवी मुंबई युनिट ३ च्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी काल मध्य रात्री अटक केली आहे. आता पुढील आरोपींचा शोध सुरू असून त्यांना ही लवकरच अटक केली जाणार आहे.