Saturday, August 24 2019 11:09 pm

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाला आठवड्याभराची मुदतवाढ;मराठा विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबई :  मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय प्रवेशासाठीची मुदत वाढवली जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आश्वासन दिले आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारची अध्यादेश आणण्याची तयारी आहे, परंतु आचारसंहिता अडसर ठरत असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि गिरीश महाजन यांच्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बैठक  झाली.त्यानंतर  महाजन यांनी आझाद मैदानात जाऊन  भेट घेतली व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.  यावेळी काही विद्यार्थ्यांनी महाजनांना खडे बोल सुनावले. परंतु मुख्यमंत्री स्वत: या प्रकरणात लक्ष घालत असल्याचे सांगत महाजनांनी मराठा विद्यार्थ्यांना आश्वस्त करण्याचा प्रय़त्न केला.
पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना उद्यापर्यंत महाविद्यालयाची निवड करावी लागणार आहे. परंतु आरक्षणाच्या घोळामुळे मराठा विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची निवड करण्यात अडचण आली. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याने ही मुदत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची निवड करण्यासाठी अजून एक आठवडा मिळणार आहे.
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशापासून वंचित राहिलेल्या मराठा विद्यार्थांच्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेतली आहे. त्यानंतर राज्य सरकारने आंदोलन मिटवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. सरकारकडून याबाबत अध्यादेश काढला जाण्याची शक्यता आहे. परंतु आचारसंहितेमुळे ते शक्य होणार नसल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.