Thursday, December 12 2024 6:56 pm

पत्रकार भवन गैरव्यवहारप्रकरणी ठेकेदार राजन शर्मा यांच्यासह संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ठाणे : जिल्हा पत्रकार संघाला शासनाने दिलेल्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या पत्रकार भवनाचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ठेकेदार राजन शर्मा यांच्यासह संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने ठाणे जिल्हाधिकारी तसेच शासन दरबारी सतत पाठपुरावा केला होता.तेव्हा, कारवाई टाळण्यासाठी शर्तभंग कारवाईस स्थगिती आदेश घेणाऱ्या ठेकेदार शर्मा बंधुचे अनेक कारनामे उघड होण्याची चर्चा रंगली आहे.
   
ठाणे पश्चिमेकडील गावदेवी मैदानालगत पत्रकार भवनाची भव्य वास्तू उभारली होती. १९८८ मध्ये शासनाने दिलेल्या भूखंडावर जुन्या पत्रकार संघाशी करार करून ठेकेदार राजन बी. शर्मा व किशोर शर्मा या बंधुंनी इमारत उभारून पत्रकार संघाला जागा न देता गाळे व हॉलची परस्पर विक्री केली. यासंदर्भात,ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ व ठाणे जिल्हा पत्रकार संघ गेली १२ वर्षे आवाज उठवून पाठपुरावा करीत आहे. मध्यंतरी, तत्कालीन महसूल मंत्र्याकडून ठेकेदारांनी शर्तभंग कारवाईबाबत स्थगिती आदेश घेतला होता. त्यावर पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांनी आक्षेप घेत शर्तभंग उठवण्याबाबतची विनंती केली होती. त्यानंतर महसूलमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. मात्र,प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचे कारण देत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय व महसूल विभागाने शर्मा बंधुवर कोणतीही कारवाई केली नव्हती.

मात्र,शासनाने ९ जून रोजी निर्गमित केलेल्या आदेशात जिल्हा प्रशासनाला कार्यवाहीचे निर्देश दिले. उपविभागीय अधिकाऱ्यांनीही शर्तभंग झाल्याचे नमुद केले असुन,महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाने दिलेली स्थगितीची कालमर्यादा फक्त सहा महिन्यापर्यंत लागू राहते.अपवादात्मक परिस्थितीत स्थगितीची कालमर्यादा सहा महिन्यानंतर वाढविली असल्यास स्थगिती चालू राहील, अन्यथा स्थगिती आपोआप व्यपगत होते. या प्रकरणात स्थगितीचा कालावधी वाढवून दिल्याचे निदर्शनास येत नसल्याने पुढील कार्यवाहीचे आदेश शासनाचे कक्ष अधिकारी भास्कर पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने ठेकेदार शर्मा बंधुवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.