मुंबई, २१ : संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे. या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचाच एक भाग म्हणून पणन विभागामार्फत दि. २२ ते २४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे “मिलेट महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. २२ फेब्रुवारी, २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता होणार आहे. तसेच प्रमुख पाहुण्यांचे हस्ते मिलेटविषयी सर्वंकष माहिती असणारे ‘पुस्तक’ देखील प्रकाशित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांचे ‘मिलेट’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
पणन विभागातर्फे मिलेट विपणन व मूल्य साखळीचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. मिलेट धान्याचे आरोग्यविषयी फायद्याबाबत प्रचार, प्रसिध्दी व जाणीव निर्माण करणे, आहार साखळीमध्ये मिलेटचे हरविलेले स्थान परत मिळविणे व खप वाढविण्याकरीता नवीन ग्राहक वर्ग तयार करणे, उत्पादन ते ग्राहकांपर्यंत संघटित मूल्यसाखळी तयार करून उत्पादकांना अधिक मूल्य व ग्राहकांना माफक दरात मिलेट उपलब्ध करणे हे मिलेट विपणन व मूल्यसाखळी मिशनचे उद्दिष्टे आहेत.
तीन दिवसीय महोत्सवाची रूपरेषा
दि. २२ फेब्रुवारी, २०२३ रोजी मिलेट विपणन आणि मूल्यसाखळी एक दिवसीय परिषद होईल.
दि.२३ फेब्रुवारी, २०२३, रोजी मिलेट खरेदीदार-विक्रेता संमेलन व खरेदी करारावर स्वाक्षरी होईल.
दि. २२ ते २४ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत मिलेट व मिलेट पदार्थ राज्यस्तरीय प्रदर्शन व विक्री होईल.
महाराष्ट्रात मिलेट मिशन मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. मिलेट धान्य, पीठ व विविध मूल्यवर्धित मिलेटचे खाद्य उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याकरीता मिलेट उत्पादक, शेतकरी उत्पादक कंपन्या, प्रक्रिया करणाऱ्या संस्था व उद्योजक तसेच पणनमध्ये असलेल्या विविध सहकारी संस्थांच्या मूल्यसाखळी निर्माण करणे तेवढेच महत्वाचे आहे. मिलेट खरेदीदार-विक्रेता संमेलन व खरेदी करारामुळे तसेच राज्यस्तरीय तीन दिवसीय प्रर्दशनामार्फत मिलेट विक्रीमुळे सर्वसाधारण लोकांना माफक दरामध्ये उपलब्ध होण्यास मदत होईल.
या मिलेट महोत्सवाला राज्यातील मिलेटविषयी उत्सुक जनतेने तसेच मिलेट उत्पादक शेतकरी, मूल्य साखळीतील घटक, शेतकरी उत्पादक कंपन्या, व्यापारी यांनी भेट द्यावी, असे आवाहन पणन विभागाद्वारे करण्यात आले आहे. मिलेट महोत्सव सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सर्वांसाठी खुले असेल