Tuesday, November 19 2019 3:10 am
ताजी बातमी

पक्षश्रेष्ठींच्या नाराजीमुळे उमेदवारी अर्ज मागे ; मात्र कपिल पाटलांना विरोध कायम – सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे

भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे बाळ्यामामा यांनी बंडखोरी करत भरलेला उमेदवारी अर्ज शुक्रवारी अखेर मागे घेतला . शिवसेनेला संपविण्याची भाषा करणारे भिवंडी लोकसभा मतदार संघाचे भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात शिवसेना पक्षश्रेष्ठींचा आदेश न जुमानता सुरेश ( बाळ्या मामा ) म्हात्रे यांनी कपिल पाटील यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता . मात्र सुरेश म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली शिवसेना पक्ष श्रेष्ठींनी सुरेश ( बाळ्यामामा ) म्हात्रे यांना उमेदवारी अर्ज भारल्याच्या दिवशीच तडका फडकी सेनेच्या ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुख पदावरून निलंबनाची कारवाई केली . सुरेश म्हात्रे यांच्यावरील कारवाईने ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप पसरला होता . त्यानंतर शिवसेनेच्या पक्ष श्रेष्ठींकडून सुरेश ( बाळ्या मामा ) म्हात्रे यांची मनधरणी करण्याचा जोरदार प्रयत्न झाला . अखेर पक्ष श्रेष्ठींच्या आग्रहाखातर सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा ) यांनी शुक्रवारी दुपारी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला .

             विशेष म्हणजे खासदार कपिल पाटील यांना आपला विरोध होता म्हणूनच आपण त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता . युतीला माझा कदापी विरोध नव्हता आणि नाही मात्र ज्या कपिल पाटलांनी शिवसेना संपविण्याचा विडा उचलला होता, ज्या कपिल पाटलांनी शिवसैनिकांची आर्थिक , राजकीय कोंडी केली , ज्या कपिल पाटलांनी शिवसैनिकांवर खोट्या केसेस दाखल केल्या सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्या कपिल पाटलांनी शिवसेनेचा भगवा ध्वज जाळला त्या कपिल पटलांनाचा कट्टर शिवसैनिक म्हणून मी कदापी समर्थन करणार नाही . केवळ पक्ष श्रेष्ठींच्या आग्रहाखातर आपण आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे . मात्र अर्ज मागे घेतला असला तरी शिवसेना संपविण्याची भाषा करणाऱ्या खासदार कपिल पाटील यांना आपला विरोध होता,आहे व कायम राहील अशी प्रतिक्रिया सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा ) यांनी दिली आहे . 

           सुरेश म्हात्रे यांच्या या प्रतिक्रिये नंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या अडचणीत दुप्पटीने वाढ झाली आहे . तर दुसरीकडे उमेदवारी अर्ज मागे घेतल्या नंतर सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा ) नेमकी कोणाचे समर्थन करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .