Wednesday, June 3 2020 10:56 am

पंतप्रधान झाल्यावर एकही वचन पूर्ण केले नाही,दाखवल्या खोट्या आशा; राहुल गांधींचा मोदींवर घणाघाती आरोप

संगमनेर :- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकरी, तरुणांना मोठमोठी स्वप्न दाखवली. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख देण्याच्या थापा मारुन ते सत्तेत आले आणि सत्तेत आल्यावरही थापेबाजी सुरुच आहे, अशा कडक शब्दांत राहुल गांधीनी मोदींवर हल्ला चढवला. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी राहुल यांनी संगमनेरमध्ये सभा घेतली.त्यावेळी ते बोलत होते.

मोदींनी जनतेची फसवणूक केली. मात्र आम्ही पूर्ण अभ्यास करुन तयार केलेली ‘न्याय योजना’ घेऊन येत आहोत. त्यातून गरिबांना न्याय, अर्थव्यवस्थेला चालना आणि नोकऱ्या उपलब्ध होतील, असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं. राहुल यांनी 56 इंच छातीचा उल्लेख करत मोदींवर घणाघात केला.

मी वृत्तपत्रात वाचतो अनिल अंबानीला कर्ज दिलं. मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या बँकांकडून कर्ज घेऊन पळून गेले. पंधरा लाख रुपये प्रत्येकाला द्यायचं वचन नरेंद्र मोदींनी दिलं होतं. भारतातील गरीबांच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करणार हा नरेंद्र मोदींचा जुमला होता, अशी टीकाही राहुल गांधींनी केली.

नरेंद्र मोदींनी रात्री आठ वाजता नोटाबंदी केली, रात्री बारा वाजता गब्बर सिंग टॅक्स (जीएसटी) लागू केला. शेतकरी, महिलांचे पैसे घेऊन बँकेत टाकले. नोटाबंदीमुळे बाजारातील खरेदी बंद केली, असंही राहुल गांधी म्हणाले.

2019 निवडणुकीनंतर कर्जासाठी शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकले जाणार नाही. सरकार कायदा बनवेल. शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प आम्ही मांडू. दोन कोटी लोकांना रोजगार मिळेल, असं सांगतानाच रोजगार देण्याएवजी मोदींनी रोजगार हिरावून घेतल्याचा आरोपही यावेळी राहुल गांधींनी केला.