Monday, April 21 2025 10:03 am
latest

न्यू ऑरेंजसिटी को-ऑप सोसायटीतील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी लेखापरीक्षक नियुक्त – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

मुंबई, 18 : नागपूर जिल्ह्यातील न्यू ऑरेंजसिटी अर्बन क्रेडीट को-ऑप सोसायटी मर्या. या संस्थेच्या अध्यक्षांनी ठेवीदारांच्या ठेवीच्या रकमेत गैरव्यवहार केल्याचे लेखापरीक्षण अहवालात निदर्शनास आले आहे.

लेखापरीक्षणासाठी विशेष लेखापरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली असून १५ दिवसात अहवाल सादर करण्यात येईल, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सदस्य प्रशांत ठाकूर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य योगेश सागर, नितीन राऊत, प्रकाश सोळंके यांनीही उपप्रश्न उपस्थित केला.

सहकार मंत्री श्री. पाटील म्हणाले, सन २०२१-२२ च्या लेखापरीक्षण अहवालात संस्थेच्या अध्यक्षांनी ठेवीदारांच्या ठेवींच्या रकमेत गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात ठेवीदारांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने संस्थेचे सन २०२२-२३ चे लेखापरीक्षण करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक, नागपूर यांच्या आदेशान्वये विशेष लेखा परीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संस्थेचे सन २०१७-१८ ते २०२१-२२ या कालावधीचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

ठेवीदारांच्या ठेवी परत मिळत नसल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने याबाबत चौकशी करण्याकरिता सहायक निबंधक, सहकारी संस्था, काटोल यांची नियुक्ती करण्यात आली असून कलम ८८ अंतर्गत चौकशी सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.