Saturday, January 18 2025 5:38 am
latest

निवडणूकीची खुमखुमी असेल तर राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवा शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे उद्धव गटाला आव्हान

मुंबई 12 सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नैतिकतेच्या गप्पा ठाकरे गटाकडून मारल्या जात आहेत. मात्र नैतिकता शिल्लक असेल तर ठाकरे गटात उरलेल्या शिवसेना आणि भाजपच्या एकत्रित मतांवर निवडून आलेल्या आमदारांनी आधी राजीनामा द्यावा. तुमच्या पाठिशी लोक असतील तर निवडणुकांना सामोरे जा, निवडून या आणि मग नैतिकतेच्या गप्पा मारा, असे आव्हान शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील शिवसेना भाजप महायुती सरकार आणखी भक्कम झाले आहे. मात्र त्यानंतरही विरोधकांकडून खोटी माहिती पसरवली जाते आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या बाळासाहेब भवन येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि ऍड. निहार ठाकरे उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटावर हल्ला चढविला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे वाचन करत खासदार शिंदे यांनी ठाकरे गटाने न्यायालयाकडे केलेल्या आठ पैकी ६ मागण्या फेटाळल्याचीही माहिती यावेळी दिली.

नैतिकतेच्या गप्पा करणाऱ्यांनी २०१९ मध्ये भाजप सोबत निवडणूक लढवली. एकत्रितपणे लोकांच्या समोर गेले, बॅनरवर फोटो लावले आणि युतीत निवडणूक आले. पण त्यानंतर मुख्यमंत्री पदाची खुर्ची दिसायला लागली. त्यासाठी दुसऱ्यासोबत संसार थाटला. नैतिकता असती तर दुसऱ्यांसोबत सरकार स्थापन केले नसते, असा घणाघात खासदार डॉ. शिंदे यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात विधानसभा अध्यक्षांची निवड वैध ठरवले आहे. त्यांना अपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आता काही जण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापेक्षा हे मोठे झालेत आहेत, अशी खिल्लीही डॉ. शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची उडवली.

काही लोक बरळत सुटले आहेत. ते आता राज्यपाल्याचे पद बरखास्त करा, अशीही मागणी करू लागल्याचेही डॉ. शिंदे यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या दुटप्पी भूमिकेवरही यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केले. ठाकरे शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार होतो. मात्र ते स्वतः मुख्यमंत्री पदावर बसले. निवडणुकी आधी केलेली युती नंतर तोडली ती नैतिकता होती का. ती जनतेसोबत गद्दारी आणि जनमताची प्रतारणा नव्हती का ? , असा सवालही डॉ. शिंदे यांनी उपस्थित केला.

यावेळी बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे वाचन करत त्याचा अर्थही सांगितला. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाकडे विविध मागण्या केल्या होत्या. त्याच्या आठ पैकी सहा मागण्या फेटाळून लावत त्यांना दणका दिल्याचीही माहिती डॉ. शिंदे यांनी दिली. ज्या आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली ते कामकाजात सहभागी होऊ देऊ नका, अशी त्यांची मागणी होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती नाकारली. ते विधानसभेच्या कामकाजात सहभागी होऊ शकतात असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. अध्यक्षाने चौकशी करून निर्णय घेण्याचे कोर्टाने सांगितले आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करण्याचे काम, नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम, नागरिकांची सहानभूती मिळवण्यासाठी खोटे बोलण्याचे काम केले जाते आहे. खोटी माहिती पसरवली जाते आहे, असा आरोप डॉ. शिंदे यांनी ठाकरे गटावर केला. सध्या जनतेची दिशाभूल करून संभ्रम निर्माण करण्याचे काम विरोधकांकडून केले जाते आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना शपथविधीसाठी बोलवण्याचा निर्णय घेतला, तो निर्णय रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र न्यायालयाने ती मागणी फेटाळली. विधानसभा अध्यक्षाची निवड नियमानुसार झाली आहे. त्यामुळे ते आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेतील, असे न्यायालयाने आपल्या निकलात जाहीर केले आहे. एकनाथ शिंदेंना हटवून मला पुन्हा मुख्यमंत्री पदी बसवा अशी मागणी ठाकरेंनी केली होती. एकीकडे नैतिकतेच्या गप्पा मारता दुसरीकडे न्यायालयाकडे पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसवा अशी मागणी करायची. नैतिकतेच्या नावावर नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम उद्धव ठाकरेंकडून सुरू आहे. कोर्टाने मात्र यांना राजीनाम्याची आठवण करून देत यांची मागणी फेटाळली आहे, असेही डॉ. शिंदे यावेळी म्हणाले. अपात्रतेबाबत सर्व निर्णय विधानसभा उपाध्यक्षांना घेण्याचा अधिकार देण्याची मागणी ठाकरे गटाने केली होती. मात्र न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. त्यांची ती मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

ठाकरे गटाकडे उरलेले आमदार, खासदार शिवसेनेत येणार आहेत. त्यांना थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत चुकीची माहिती पसरवून संभ्रम पसरवला जातो आहे. ठाकरे गट जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. निकालाबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. सरकार पडणार म्हणून सातत्याने खोट पसरवलं जाते आहे. आपल्या बाजूने सहानभूती मिळावी यासाठी हे खोटे बोलण्याची वेळ ही त्यांच्यावर आली आहे, असेही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. आम्ही खोट बोलून ओऱडून सागंत नाही. पण सत्य सांगण्यासाठी आलो असेही खासदार डॉ. शिंदे यावेळी म्हणाले. नैतिकतेवर बोलण्याआधी शिवसेना, भाजपच्या एकत्रित मतांवर निवडून येणाऱ्यांनी आधी राजीनामा द्या. लोक जर खरचं तुमच्या बाजुने उभे असतील तर निवडणुकांना सामोरे जा. निवडून या मग नैतिकतेवर बोला, असे खुले आव्हान खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी ठाकरे गटाला दिले.
ज्यांना निवडणुकांची हौस आहे त्यांनी राजीनामा द्यावा. शिवसेना भाजपला ४६ टक्के मते मिळाली होती. खरचं नैतिकता असेल तर आधी राजीनामा द्या. उद्याच राजीनामा द्या. निवडणुकांना सामोरे जा. लोक कुणाच्या बाजूला उभे आहेत ते तुम्हाला कळेल, असेही डॉ. शिंदे यावेळी म्हणाले.

यावेळी उदय सामंत यांनीही ठाकरे गटावर हल्ला चढवला. कालपासून नैतिकतेचे धडे ज्यांना नैतिकता नाही ते देत आहेत. दुटप्पीपणा गेले काही महिने बघितले आहे. बारसूबाबत दुटप्पीपणा समोर आला. मुख्यमंत्री व्हायच नाही अशा नैतिकतेच्या गप्पा मारायचा. आणि पुन्हा पदावर बसवा असे सांगत आहेत. शिवसैनिक मुख्यमंत्री बनवणार म्हणाले आणि स्वतः झाले, असा हल्ला सामंत यांनी चढवला. त्यांच्या गटातील आमदार, खासदार आपल्यासोबत रहावेत यासाठी यासाठी खोटं बोललं जात आहे. संजय राऊत म्हणतात तीन महिन्यात पुन्हा न्यायालय निकाल देईल, असे खोटं पसरवलत आहेत. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हे कालबाह्य झाले आहेत. त्यामुळे हा न्यायालयाचा अवमान आहे, असेही सामंत यावेळी म्हणाले. याप्रसंगी आमदार संजय शिरसाठही उपस्थित होते.