Monday, June 17 2019 4:33 am

सुमित्रा महाजन यांचा इंदूरमधून निवडणूक लढण्यास नकार.

इंदूर –
गेल्या काही दिवसांपासून इंदूरच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या तर्कवितर्कांच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आज खूप महत्त्वाची घोषणा केली. ”मी आता लोकसभा निवडणूक लढवणार नाही. इंदूरमधील उमेदवारीबाबत पक्ष योग्य वाटेल तो निर्णय घेऊ शकतो, असे सुमित्रा महाजन यांनी प्रसारमाध्यमांना लिहिलेल्या खुल्या पत्रात म्हटले आहे. 
 75 वर्षांवरील नेत्यांना उमेदवारी न देण्याबाबत भाजपाकडून धोरण निश्चित करण्यात आले होते. या धोरणामुळे पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना यावेळी उमेदवारी देण्यात आलेली नाही. मावळत्या लोकसभेच्या अध्यक्ष असलेल्या सुमित्रा महाजन या इंदूर येथून सलग आठवेळ लोकसभेवर निवडून आल्या होत्या. सुमित्रा महाजन यांची इंदूरमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता असल्याने त्यांना उमेदवारी नाकारणे शक्य होत नव्हते.  अखेरीस सुमित्रा महाजन यांनीच निवडणूक न लढवण्याची घोषणा केल्यानंतर सर्वांनी मोकळा श्वास घेतला.