नागपूर, 18 : नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विकास आराखड्यातील त्रुटी दुरुस्त करून त्यास मंजुरी देण्यात येईल तसेच महानगरपालिकेची हद्दवाढ करण्यास आणि त्यात समाविष्ट होण्यास लगतच्या गावांची तयारी असेल तर राज्य शासन सकारात्मक असल्याची कबुली मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य श्रीमती देवयानी फरांदे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना ०१ मार्च, २०१७ अन्वये करण्यात आली असून, कामकाज दि. १२ जुलै २०१७ पासून सुरु झाले आहे. प्राधिकरणाच्या क्षेत्रातील नियोजनबद्ध विकास होण्यासाठी प्रदेशासाठीचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यासाठीच्या तांत्रिक बाबींच्या अनुषंगाने नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून विशेष नियोजन प्राधिकरण या नात्याने विकास योजना तयार करण्यासंबंधीचा प्रस्ताव प्राप्त झाला असून मान्यतेसाठी शासनास सादर करण्यात आलेला आहे. त्यातील त्रुटी दूर करून शासन स्तरावरुन त्वरीत मंजूरी देण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी गेली.
नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी पूर्णवेळ महानगर आयुक्त म्हणून भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्याची नेमणुक करण्यात आली आहे. इतर अधिकारी आणि कर्मचारी यांचा आकृतीबंध मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आला असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.