Sunday, August 9 2020 11:34 am

नाशिककरांना सतर्कतेचा इशारा

नाशिक :- मुंबईसह नाशिक मध्ये देखील मुसळधार पावसाने  जोरदार आहे. नाशिक मध्ये काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.  गंगापूर, पालखेड धरणाच्या क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने धरणांमधील पाणी पातळी वाढली  आहे. हवामान विभागाने पुढील तीन तासांत अतिवृष्टिचा इशारा दिला आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने नाशिकमध्येउपस्थिती लावलीआहे. शनिवारी रात्रीनंतर पावसाचा जोर अधिकच वाढला. त्यामुळे नाशिककरांची रविवारची सकाळ पावसा समवेतच उगवली. पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात रविवारी सकाळी साडेआठपर्यंत २४ तासांत ६४४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये १३५ मिलीमीटर तर इगतपूरीत १७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. गंगापूर धरण समूहाचे हे पाणलोट क्षेत्र असून या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे. गोदावरी नदीमधील पाणी पातळी वाढली असून जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.