ठाणे जिल्ह्याला वाढीव भरघोस निधी मंजूर
ठाणे, 15 :- नाविण्यपूर्ण योजनेमधून आरोग्य व शिक्षण विभागावर खर्च करणार असून ठाणे जिल्ह्याला सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये भरघोस वाढीव निधी मंजूर झाला आहे, असे प्रतिपादन आज राज्य उत्पादन शुक्ल तथा पालकमंत्री ठाणे श्री. शंभूराज देसाई यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीमध्ये केले.
यावेळी सार्वजिनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, श्री.नरेश मस्के, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, शिक्षक आमदार श्री.म्हात्रे, आमदार डॉ.बालाजी किणीकर, गिता जैन, संजय केळकर, प्रमोद पाटील, किसन कथोरे, कुमार आयलानी, दौलत दरोडा, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री.वैभव कुलकर्णी, सर्व महानगरपालिका आयुक्त, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती संगीता पाटील तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री श्री.देसाई म्हणाले की, यावर्षी ठाणे जिल्ह्याला जिल्हा नियोजन समितीला मंजूर नियतव्ययापेक्षा जास्तीचा वाढीव निधी देण्यात आलेला आहे. राज्यामध्ये ठाणे जिल्हा हा दुसऱ्या क्रमांचा जास्त निधी मिळणारा जिल्हा आहे. 2023-24 मधील खर्चाचा आढावा व 2024-25 मधील खर्चाचे नियोजन याबाबत चर्चा या बैठकीमध्ये झाली. संभाव्य निवडणूक बघता या वर्षीचा निधी वेळेवर खर्च झाला पाहिजे, यासाठी यंत्रणेमधील सर्व अधिकाऱ्यांनी योग्य ते नियोजन केले पाहिजे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये कोणती प्रकारची कपात करण्यात येणार नाही. त्यामुळे विहित वेळेत सर्व निधी खर्च झाला पाहिजे. यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत. नाविण्यपूर्ण उपक्रमामध्ये आरोग्य व शिक्षण विभागावर खर्च करण्यात येणार आहे.
जिल्ह्यामध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या शाळांना मॉडेल मराठी शाळा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. यासाठी सीएसआर मधील निधीही उपलब्ध करुन दिला जाणार आहे. कोविड काळातील विनावापरामुळे पडून असलेल्या साहित्यांचा वापर करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. लोकप्रतिनिधींच्या कामांच्या याद्या लवकरात लवकर सादर करण्याबाबत विनंती केली. निवडणूक आचारसंहिता लागणार असल्याने निविदा मर्यादा शिथील करण्यात आली आहे. त्यामुळे योग्य नियोजन करुन निधी विहित वेळेत खर्च करण्याच्या सूचना सर्व यंत्रणांना दिली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.रविंद्र चव्हाण यांनी सर्व उपस्थित यंत्रणांना सूचना दिल्या की, शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे. समाजातील सर्व घटकांपर्यंत शासकीय योजना पोहोचल्या पाहिजेत. यासाठी शासनाकडून अनेक तरतूदी करण्यात आल्या आहेत. 15 ऑगस्ट 2024 पर्यंत या योजना कार्यान्वित होणे आवश्यक आहे. यासाठी सर्व यंत्रणांनी गतिमान पध्दतीने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लागतील.