Monday, June 1 2020 2:07 pm

नाल्यातील गाळ पालिका मुख्यालयासमोर टाकू आनंद परांजपे यांचा इशारा

ठाणे –  पहिल्या पावसातच  नौपाडा, वर्तकनगर आणि मुंब्रा प्रभाग समितीअंतर्गत असलेल्या काही भागात अपुऱ्या नालेसफाईमुळे  पाणी तुंबण्याचे प्रकार  समोर आले.  ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे 2 जून पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाने संबंधित ठेकेदारांना दिले होते. तरी देखील ठेकेदारांनी नालेसफाई केलीच नाही. सत्ताधारी भ्रष्टाचारी शिवसेना आणि ठामपा प्रशासनातील काही अधिकारी  ठेकेदारांच्या फायद्यासाठी अन् स्वत:च्या हितासाठी ठाणेकरांच्या जीवाशी खेळत आहेत.आता पुन्हा पाणी तुंबले तर नाल्यातील गाळ थेट पालिका मुख्यालयासमोरच नेऊन टाकू, असा इशारा  राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी  उपस्थित केला.

सोमवारी झालेल्या तासाभराच्या पावसातच ठाणे शहरातील अनेक भाग जलमय झाले होते. त्या निषेधार्थ काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाला आनंद परांजपे यांनी भेट दिली. या पसंगी त्यांनी पत्रकारांशी बोलताना हा इशारा दिला. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते हणमंत जगदाळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रभाकर सावंत, रवींद्र पालव, नितीन पाटील, काँग्रेसचे सचिन शिंदे, राजेश जाधव आदी उपस्थित होते.  यावेळी ठामपा उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे निवेदन स्वीकारले.
परांजपे म्हणाले की, सत्ताधारी शिवसेना आणि ठामपा प्रशासनाला खोटे बोल पण रेटून बोल, अशी सवयच लागली आहे. साधारणपणे 31 मे पर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याची गरज असतानाही नालेसफाईची कामे पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळेच  सोमवारी रात्री अवघा एक तास झालेल्या जोरदार पावसामुळे ठाणे पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे.  अवघ्या एकाच तासाच्या पावसाने नाल्यातील घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरले. वर्तकनगर, नौपाडा आणि मुंब्रा  प्रभाग समितीच्या अंतर्गत असलेल्या अनेक भागांमध्ये पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. पालिका मुख्यालयापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या संभाजी नगर भागातील नागरिकांना याचा मोठा फटका सहन करावा लागला आहे . वर्तक नगर येथील म्हाडा वसाहतीमध्ये नाल्याचे घाण पाणी आणि गाळ घरात घुसल्याने नागरिकांना रात्रभर हा गाळ उपसावा लागला.  तर, संभाजी नगरात  नालेसफाईमध्ये बाहेर काढून ठेवलेला गाळ नागरिकांच्या घरात घुसला.     गेल्या वर्षी अतिवृष्टीदरम्यान संभाजी नगर भागातून एक महिला नाल्यातून वाहून गेली होती.  तरीही, प्रशासनाला आणि सत्ताधारी शिवसेनेला त्याचे सोयरसुतक नव्हते. सोमवारी ठाण्यातील जे भाग जलमय झाले आहेत. त्याला  ठाणे महानगर पालिकेचे घनकचरा अधिकारी आणि आर्थिक हितसबंध ठेवणारे सत्ताधारी शिवसेनेचे पुढारीच जबाबदार आहेत. अनेक वर्षे एकाच ठिकाणी बसलेल्या या अधिकार्‍यांचे ठेकेदारांशी हितसंबध असल्याने ते ठेकेदारांवर मेहरनजर करीत आहेत. त्यातूनच नालेसफाई पूर्णपणे न झाल्यानंतरही त्यांना अभय दिले जात असल्याचा आरोपही आनंद परांजपे यांनी केला आहे.