ठाणे (१७) : ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या नालेसफाईची कामे सुरू आहेत. या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर गाळ, कचरा काढला जात असून तो रस्त्यावर जास्त काळ न ठेवता तत्काळ उचलण्यात यावा. परिसरात दुर्गंधी पसरू नये, अशा सूचना ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिल्या आहेत.
अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी शुक्रवारी नौपाडा, कोपरी, वागळे इस्टेट या भागातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी गाळ उचलण्याबाबत सूचना दिला. ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळील नाल्याच्या कामाचीही पाहणी रोडे यांनी केली.
नालेसफाईच्या कामांचा वेग वाढवून कोणत्याही परिस्थितीत नियोजित वेेळेत ही कामे पूर्ण करण्यात यावे. त्यासाठी दैनंदिन स्वरुपात या कामांचा आढावा घेण्याच्या सूचनाही रोडे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागास दिला.
या पाहणीच्या वेळी उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आदी उपस्थित होते.