Monday, September 28 2020 3:09 pm

नालायक आणि मूर्ख लोकांना संसदेत पोहचू देणार नाही


सावरकरांना भित्रा म्हणणाऱ्या राहुल गांधींवर उद्धव ठाकरेंनी केली टीका.

सांगली : राहुल गांधी हे सावरकरांना भित्रा म्हणतात. सावरकरांना भित्रा म्हणणारा राहुल गांधीसारखा नालायक माणूस संसदेत पोचता कामा नये, असे वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. याचवेळी राजू शेट्टींना मागील वेळेस पाठींबा दिला ही आपली चूक होती, असेही ठाकरे म्हणाले.
हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत इस्लामपूरमध्ये सभा पार पडली. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
सावरकरांना समजून घ्यायचं असेल तर त्यांचं साहित्य वाचावे.  मराठी समजत नसेल तर इटलीच्या भाषेत लिहून घेऊन भाषण करण्याचा बोचरा टोमणा मिश्रित सल्लादेखील त्यांनी दिला. वीर सावरकरांनी देशासाठी जे कष्ट भोगलंय तसं कष्ट जर नेहरूंनी भोगलं असतं  तर मी त्यांनाही वीर जवाहरलाल नेहरू बोलायला तयार आहे, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. गेल्यावेळी नको त्या माणसाला जागा दिली असे म्हणत ठाकरे यांनी शेट्टींवर टीका केली.
यावेळी चंद्रकांत पाटलांनीदेखील राजू शेट्टींसह शरद पवारांवर तोंडसुख घेतले. राजू शेट्टींना पाडायला भाजप- सेनेची गरज नाही, त्यांना पाडायला एकटे शरद पवारच पुरे आहेत, असे पाटील यावेळी म्हणाले. पवारांनी आतापर्यंत अनेक महान आणि मोठ्या नेत्यांना फसवले आहे असेदेखील ते म्हणाले.