Thursday, December 5 2024 5:30 am

नाटक मनुष्याला आनंदाची अनुभूती देते – सुधीर मुनगंटीवार

मुंबई, १९: सध्याचे युग हे धनाचे नसून आनंदी मनाचे आहे. संयुक्त राष्ट्र ही आता राष्ट्र किती धनवान आहे, हे बघत नसून किती आनंदी आहे हे बघते. त्यामुळे राष्ट्रांचा ‘हॅपिनेस इंडेक्स ‘ तयार करण्यात आला आहे. नाटक बघून मनुष्य आपले दुःख विसरतो व त्याला आनंदाची अनुभूती मिळते, असे विचार सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज व्यक्त केले.

सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या 150 व्या जयंतीवर्षा निमित्त त्यांच्या संगीत नाटकांवर आधारित ‘शुरा मी वंदिले’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन आज दादर येथील शिवाजी नाट्य मंदिर येथे करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला, तेव्हा ते बोलत होते.

ना.श्री मुनगंटीवार पुढे म्हणाले की, या कार्यक्रमामुळे नाट्याचार्य कृ.प्र. खाडिलकर यांचा जीवनपट समोर आला. सांस्कृतिक कार्य विभाग ऊर्जा असलेला विभाग आहे. सांस्कृतिक कार्य विभागाला अधिक बळकट करण्यासाठी सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रतिभावंतांनी आपल्या सूचना द्याव्यात, असे आवाहनही सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले.

या कार्यक्रमाच्या वेळी शिवाजी नाट्य मंदिरात अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, अभिनेता शैलेश दातार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सहसंचालक श्रीराम पांडे, स्वरकुल संस्थेच्या श्रीमती विणा खाडिलकर आणि त्यागराज खाडिलकर आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक सांस्कृतिक कार्य विभागाचे सहसंचालक श्रीराम पांडे यांनी केले. स्वातंत्र्य सैनिक, लेखक, पत्रकार, नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांचे समग्र लेखन आणि जीवनावर आधारीत “शुरा मी वंदिले” हा कार्यक्रम
असल्याचे त्यांनी सांगितले. नाट्याचार्य कृ. प्र खाडिलकर यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संचालन त्यागराज खाडिलकर यांनी केले.