Saturday, January 18 2025 6:30 am
latest

नागरिकांच्या तक्रारीचे निवारण पूर्ण क्षमतेने करा, चालढकलपणा करु नका

ठाणे -14 : नागरिकांनी महापालिकेत स्वत: येवून किंवा दूरध्वनीवरुन संपर्क साधून एखाद्या समस्येबाबत तक्रार केली तर त्या नागरिकांचे म्हणणे समजून घ्या, त्यांच्याशी समंजसपणे संवाद साधून त्यांची तक्रार पूर्ण क्षमतेने सोडविण्याचा प्रयत्न करा. विनाकारण नागरिकांना संबंधित विभागात जा, हे काम आमचे नाही अशी उत्तरे देवू नका. समस्यांचे निराकरण करण्याचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवा अशा सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत अधिकारी, कर्मचारी यांना दिल्या.
महापालिकेत नागरिक समस्यांचे निराकरण करुन घेण्यासाठी येत असतात, अशावेळी त्यांना सहकार्य करणे हे प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. याबाबत एका नागरिकाने आयुक्त अभिजीत बांगर यांना फोन करुन त्यांना आलेला अनुभव सांगितला, याचे उदाहरण आज आयुक्तांनी बैठकीत दिले. त्यामुळे यापुढे अधिकाऱ्यांनी नागरिकांशी सामंजस्यानेच वागलेच पाहिजे अशा सूचना बैठकीत श्री. बांगर यांनी दिल्या.
शहरात सुरू असलेली रस्त्यांची कामे पुर्ण करीत असताना सदरची कामे दर्जात्मक असायला हवीत. एकत्र जोडणाऱ्या रस्त्याची पातळी समान असलीच पाहिजे तसेच महत्वाच्या रस्त्यावर साईडपट्टया नागरिक व वाहनचालकांना दिसतील अशा ठळक पध्दतीने रंगविण्यात याव्यात असे सांगतानाच महापालिकेतील सर्व अभियंत्यांनी मरगळ झटकून कामे करा असा सूचक इशाराही त्यांनी या बैठकीत दिला.
यावेळी शहर सौंदर्यीकरण कामाचा आढावा आयुक्त श्री. बांगर यांनी घेतला. यावेळी संपूर्ण शहरात सौंदर्यीकरणाच्या कामाअंतर्गत सर्वच विभागातील भिंतीवर बोलकी व आकर्षक चित्रे काढण्याचे काम सुरू आहे. ही सर्व कामे ही 15 जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
ठाणे शहरात ज्या ठिकाणी सौंदर्यीकरणाची कामे झाली आहेत त्या अंतर्गत काही ठिकाणी झालेली कामे समाधानकारक असल्याचे नमूद करत याच धर्तीवर संपूर्ण शहरात कामे व्हावीत अशा सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. महापालिका कार्यक्षेत्रातील प्रवेशद्वारही शहराची ओळख होवू शकते. या ठिकाणांहून बाहेरील नागरिक ये-जा करीत असतात. हा परिसर कायमस्वरुपी सुशोभित राखला गेला पाहिजे. या ठिकाणी सुशोभिकरणाबरोबरच प्रबोधनात्मक माहिती व बोलकी चित्रे रेखाटण्यात यावीत. तसेच उड्डाणपुलाखालील परिसर सुशोभित करणे व उपलब्ध मोकळ्या जागेत उद्यान विकसित करण्याबाबतच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
संपूर्ण शहरात सुशोभिकरणाची कामे सुरू राहतील असे नियोजन करावे व झोपडपट्टी भागातही कामे केली जातील याची दक्षता घ्यावी. ज्याप्रमाणे मुख्य रस्त्यावर सुशोभिकरण सुरू आहे, या रस्त्याला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्याला देखील रंगरंगोटी व सुशोभिकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.