मुंबई 23 : नागपूर विभागातील जल जीवन मिशन आणि जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा योजनांसाठी आवश्यक तो निधी दिला असून या योजनाच्या कामांना गती देण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
नागपूर विभागातील पाणीपुरवठा योजनांच्या कामाबाबतीत आढावा बैठक मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक अमित सैनी, मुख्य अभियंता मनीषा पलांडे, नागपूर विभागातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, विभागातील घरगुती नळजोडणीची कामे अभियानस्तरावर पूर्ण करावीत. मंजूर कामांना कार्यारंभ आदेश तत्काळ देण्यात यावा. त्रयस्थ तपासणी संस्थांनी पाणीपुरवठा योजनांच्या कामाची काटेकोरपणे तपासणी करावी आणि तपासणी अहवाल हा दर 15 दिवसांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करावा. 100 टक्के नळजोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता राष्ट्रीय जल जीवन मिशन द्वारे राज्यातील पाच जिल्ह्यांची निवड झाली आहे. त्यात नागपूर आणि वर्धा हे जिल्हे नागपूर विभागातील आहेत. त्यांनी उदिष्ट पूर्ण करण्याकरिता मिशन मोडवर कामे करण्याचे निर्देश ही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिले.
नागपूर विभागातील जलजीवन मिशन अंतर्गत कामाची भौतिक प्रगती, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थांच्या कामाची सद्य:स्थिती, नेमण्यात आलेल्या त्रयस्थ तपासणी संस्थांच्या कामाची सद्य:स्थिती, जिल्हानिहाय योजनांच्या खर्चाचा तपशील, पाणीपुरवठा योजनांची सद्य:स्थिती याबाबत यावेळी चर्चा झाली.