मुंबई 21 नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मेयो रूग्णालय येथे परिचारिकांची 145 व चतुर्थ श्रेणी संवर्गातील 160 पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य प्रवीण दटके यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले, परिचारिकांची रिक्त पदे टीसीएस या कंपनीमार्फत भरण्याची कार्यवाही सुरू असून स्पर्धा परीक्षाही घेण्यात आली आहे. ही कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. तर संस्थेतील वर्ग चार ची सरळसेवेची पदे जिल्हास्तरीय समितीमार्फत भरण्याबाबत कळविण्यात आले आहे. ही पदे उपलब्ध होईपर्यंत संस्थेने बाह्यस्त्रोतामार्फत पदे भरण्यासाठी केलेल्या करारास मुदतवाढ देण्यात आली आहे. पदभरती करताना प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेणार असल्याचे त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले. यवतमाळ येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याबाबत तत्कालिन वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कार्यवाही होईल, असेही त्यांनी अन्य एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, एकनाथ खडसे, वजाहत मिर्झा, सतेज पाटील, निलय नाईक, सचिन अहिर यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.