Tuesday, January 19 2021 10:52 pm

नवी मुंबईत उघड्यावर लघुशंका करण्यावरुन झालेल्या वादातून एकाची हत्या

नवी मुंबई : मध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर लघवी करणाऱ्या चार तरुणांना हटकल्याने एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सचिन पाटील असं मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव असून ते ३५ वर्षांचे होते. रबाळे एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या गस्तीवरील पोलिसांना सचिन हे रस्त्याच्या बाजूला जखमी अवस्थेत आढळून आले.

पोलिसांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी सचिन यांनी मृत घोषित केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन पाटील यांनी रस्त्याच्या बाजूला उघड्यावर लघुशंका करणाऱ्या एका तरुणाला हटकले. त्यावरुन झालेल्या वादातून हा तरुण आणि त्याच्या इतर तीन मित्रांनी पाटील यांना बेदम मारहाण केली.

“आमच्या तपासामध्ये आकाश गायकवाड हा तरुण मुख्य आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. २० वर्षीय आकाशला पाटील यांनी यांनी रस्त्याच्याकडेला उघड्यावर लघुशंका करु नकोस असं सांगितलं. साठे नगरमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर आकाश आणि त्याच्या तीन मित्रांनी पाटील यांना बेदम मारहाण करुन रस्त्यावरच जखमी अवस्थेत सोडून घटनास्थळावरुन पळ काढला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणातील चारही आरोपी साठे नगरमधून पळून जाण्याच्या तयारी असतानाच पोलिसांनी या चौघांना अटक केली. या चौघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असता त्यांना ५ जानेवारीपर्यंतच पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.