Wednesday, March 26 2025 5:00 pm

नवीन कळवा पुलावरील साकेतकडील पाचवी मार्गिका ही सुरू

ठाणे ११ : महापालिका कार्यक्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व वाहतूक कोंडी मुक्त करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. कळवा खाडीवरील जुन्या पुलावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेवून नवीन पुलाची उभारणी महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे. या नव्या पुलावरील तीन मार्गिका नोव्हेंबर 2022 मध्ये वाहतुकीकरिता खुल्या करण्यात आल्या. तर चौथी मार्गिका डिसेंबरमध्ये खुली करण्यात आली. साकेतकडील पाचवी मार्गिका देखील वाहतुकीकरिता मार्च 2023 अखेरपर्यत खुली करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, त्यापूर्वीच महापालिकेमार्फत सदर मार्गिका 10 मार्च रोजी वाहतूकीसाठी खुली झाली करण्यात आल्यामुळे साकेतकडून कळवा-खारीगांव आणि नवीमुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सोईचे झाले असून यामुळे निश्चितच वाहतूक कोंडी कमी होणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.

गेल्या अनेक वर्षापासून कळवा पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती, त्यामुळे सदर नवीन पुलाच्या बांधणीचे काम महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात आले होते. त्यामुळे पूल पूर्ण होण्याची नागरिकांची अनेक वर्षाची प्रतीक्षा आता संपुष्टात आली असून जुन्या कळवा पुलावरील वाहनांचा भार कमी होणार आहे. ठाणे शहरातून कळवा मुंब्र्याकडे जाणारी वाहतूक ही संपूर्णत: नवीन पुलावरुन करणे शक्य होईल. कळवा पुलाप्रमाणेच शहरातील सुरू असलेले इतर प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे हाती घेतले असून वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी महापालिका व इतर शासकीय यंत्रणा यांच्यामार्फत प्रयत्न सुरू असल्याचेही आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले.

साकेत कडून कळवा- खारीगांव व नवीमुंबईकडे जाणाऱ्या पाचव्या मार्गिकेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली असून त्यामुळे ठाणे शहरात अंतर्गत होणारी वाहतूक कोंडी कमी होणार आहे. तसेच वाहनचालकांना कमीत कमी वेळेत इच्छ‍ितस्थळी पोहचता येणार असल्याने वेळ व काही प्रमाणात इंधनाची देखील बचत होणार असल्याचे आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले.

सदर कळवा पुलाच्या एकूण पाच मार्गिका असून यामध्ये ठाणे शहराकडून कळवा, खारीगांव, मुंब्रा तसेच नवीमुंबईकडे जाण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालय आणि ठाणे कारागृहामागील या दोन मार्गिका यापूर्वीच वाहतुकीसाठी खुल्या केल्या आहेत. त्यामुळे कळवा चौक, ठाणे कारागृहासमोर होणारी वाहतूक कोंडी पूर्णपणे कमी झालेली आहे. तसेच या पुलाची तिसरी मार्गिका कळवा चौकात उतरत असून चौथी मार्गिका ठाणे- बेलापूर रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासमोर उतरविण्यात आलेली आहे. पाचवी मार्गिका साकेत रस्त्याकडून कळवा, नवीमुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी उपयुक्त असून सदर मार्गिका वर्तुळाकार पध्दतीने तयार करण्यात आलेली आहे.

सदर नवीन कळवा पुलाची एकूण लांबी 2.40 किलोमीटर असून पुलावरील मार्गिकांची सरासरी रुंदी 8.50 मीटर इतकी आहे. सदर पुलाच्या सर्व मार्गिका वाहतुकीस उपलब्ध झाल्यामुळे आता पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी उपलब्ध झालेला आहे.