मुंबई,8: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. त्याचअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील उपक्रमांचा शुभारंभ बुधवार दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे होणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून हा नमो ११ कलमी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. नमो दिव्यांग शक्ती अभियान- मुलुंड,नमो कामगार कल्याण अभियान-चांदिवली, नमो आत्मनिर्भर ग्राम अभियान- वांद्रे (पश्चिम), नमो दलित सन्मान अभियान- घाटकोपर (पूर्व), नमो तीर्थ स्थळ सुधार अभियान- विलेपार्ले (पूर्व), नमो आदिवासी स्मार्ट स्कूल अभियान- मागाठाणे- बोरीवली (पूर्व), नमो क्रीडा मैदान आणि उद्यान अभियान मालाड (पश्चिम), नमो सौर ऊर्जा कार्यालय अभियान- वांद्रे (पूर्व), नमो शेत तळे अभियान अंधेरी (पश्चिम), नमो शहर सौंदर्यीकरण अभियान- कांदिवली (पूर्व), नमो महिला सशक्तीकरण अभियान- कुर्ला (पूर्व) येथे विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
उद्या होणाऱ्या कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या योजनेमधून बचत गटांना आर्थिक मदत देणे, ५० कामगारांना सुरक्षा संचाचे वाटप करणे, पात्र महिला मच्छिमार महिला लाभार्थींना शीतपेट्यांचे वाटप करणे, महिला बचत गटांच्या सेंद्रीय उत्पादनासाठी विशेष बाजारपेठ भरविणे,जिल्हाधिकारी कार्यालय येथे सौरऊर्जा प्रकल्पाचे उदघाटन करणे, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी साहित्य वाटप करणे, दिव्यांगांना इलेक्ट्रीक साहित्याचे वाटप करणे, माता रमाबाई आंबेडकरनगर येथे गंधकुटीर समाजकल्याण केंद्राचे भूमिपूजन करणे, अंबोजवाडी, मालवणी येथे क्रीडा मैदानाचे भूमिपूजन, पार्लेश्वर मंदिराच्या परिसराच्या सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपूजन करणे असे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.