Tuesday, December 10 2024 8:29 am

नजीब मुल्ला यांच्या समोरील घड्याळाचे बटन दाबून त्यांना विजयी करा – खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे

कळवा, खारीगाव, पारसिक नगर परिसराचा विकास करणार – नजीब मुल्ला

ठाणे, 12 – आपण महायुतीमधून लढतो आहोत, महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना निवडून द्यायचे आहे. वेळ बदल घडविण्याची आहे. मतदारसंघातील वेळ बदलायची आहे, चांगली वेळ आणायची असेल तर नजीब मुल्ला यांच्या समोरील घड्याळाचे बटन दाबून त्यांना विजयी करा, असे आवाहन खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांनी मतदारांना केले.

१४९- मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत (शिवसेना, भाजपा, आरपीआय-आठवले गट, आरपीआय-कवाडे गट) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, लोकप्रिय उमेदवार नजीब मुल्ला यांची प्रचार सभा खारेगाव येथील जय भारत स्पोर्ट्स क्लब च्या पटांगणात आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, शिवसेना उपनेते दशरथ पाटील, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, विभागप्रमुख शाम पाटील, शहरप्रमुख नरेंद्र शिंदे, माजी नगरसेवक उमेश पाटील, मनोज लासे,विजया लासे,अनिता गौरी, गणेश कांबळे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष वनिता गोतपागर, शिवसेना पदाधिकारी राकेश पाटील, रचना पाटील, सुनील पाटील, सुनील गौरी आदी पदाधिकारी तसेच मोठ्यासंख्येने मतदार उपस्थित होते.

नजीब मुल्ला यांच्या रुपाने एक आश्वासक चेहरा मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून महायुतीने दिलेला आहे. ठाणे महापालिकेतील कामाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.मतदारांनी लोकप्रतिनिधी निवडून देताना खासदार, आमदार, नगरसेवक यांची कामे काय असतात ते जाणून घ्यायला हवीत. खासदार म्हणून मतदारसंघातील सेंट्रल रेल्वेत सर्वात जास्त कामे झाली आहेत, पाचवी सहावी रेल्वे लाईन चा प्रश्न मार्गी लागला आहे. इथला आमदार गेली १५ वर्ष नगरसेवकाची कामे आपल्या नावावर खपवत असतो. सक्षम पर्याय नसल्यामुळे आपण त्याला निवडून देत आलोत. प्रत्येक गोष्टीत राजकारण करणारा, रडगाणे गाणारा आमदार नको तर आपल्याला आपली कामे करणारा, सभागृहात आपले प्रश्न मार्गी लावणारा आमदार हवा, पण आता नजीब मुल्ला यांच्या रुपाने डॅशिंग, तरुण, अभ्यासू उमेदवार पर्याय म्हणून मिळालेला आहे. केंद्रात व राज्यात सत्ता आल्यावर खारेगावचा पूल केला. खारेगाव च्या अंतर्गत रस्त्यासाठी ७० कोटी आणले, १० कोटी तरणतलावासाठी आणले, भूमिपुत्र मैदानासाठी पाच कोटी मंजूर केलेत, डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी तीन कोटी रुपये मंजूर केलेत, खारेगाव च्या अंतर्गत पाईपलाईन्ससाठी साडेसात कोटी रुपये मंजूर केलेत, खुला रंगमंच केला, गॅस पाईपलाईन्स आणली अशी अनेक विकासकामे केली आहेत. क्लस्टर योजनेतून घराला घर देण्याचे काम करणार आहोत. कळवा ऐरोली एलिव्हेटेड मार्ग करतोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तळागाळातील लोकांसाठी अनेक योजना आणल्या. लोकांना जर डीपी रोड नको असेल तर शंभर टक्के डीपी रोड रद्द करु. लोकांना अपेक्षित कामे करण्यासाठी आपण निवडून आलो आहोत, नियम अटी लोकांच्या सुधिधेसाठी आहेत त्या जर लोकांना त्रासदायक ठरणार असतील तर त्या बदलल्या जातील.विधानसभेत चागले काम करण्यासाठी, सिस्टीम मध्ये काम करताना हेल्पींग हॅण्ड पाहिजे असतात, यामुळेच मला जे प्रेम, आशिर्वाद दिले तेच नजीब मुल्ला यांनाही द्या, आपण महायुतीमधून लढतो आहोत, महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना निवडून द्यायचे आहे. वेळ बदल घडविण्याची आहे. मतदारसंघातील वेळ बदलायची आहे, चांगली वेळ आणायची असेल तर नजीब मुल्ला यांच्या समोरील घड्याळाचे बटन दाबून त्यांना विजयी करा असे आवाहन खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांनी मतदारांना केले.