Friday, December 13 2024 12:17 pm

नगरपालिकांच्या थकित मुद्रांक शुल्क अनुदानाबाबत लवकरच निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 03 : मुद्रांक शुल्क अधिभार अनुदानाकरिता यावर्षी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदींमधून नगरपरिषद व नगरपंचायतींना अनुदान वितरित करण्यात येणार आहे. नगरपालिकांच्या थकित मुद्रांक शुल्क अनुदानाबाबत एक महिन्याच्या आत निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

नगरपालिकांच्या थकित मुद्रांक शुल्क अनुदानाबाबत सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायत क्षेत्रांमध्ये मालमत्तेच्या हस्तांतरणाकरिता राज्य शासनाकडून आकारण्यात आलेल्या १ टक्का मुद्रांक शुल्क अधिभार रक्कमेएवढे सहायक अनुदान नगरपालिकांना देण्याची तरतूद आहे. नगरपरिषदांना सन २०१८-१९ च्या मुद्रांक शुल्क अधिभाराच्या थकित अनुदानापोटी 70 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे. तसेच, उर्वरित थकित मुद्रांक शुल्क अनुदानाची आकडेवारी प्रमाणित करुन घेण्याची कार्यवाही सुरू असून त्यानंतर आवश्यक निधीची तरतूद करुन हे थकीत अनुदान टप्या-टप्याने देण्यात येईल.

मुद्रांक शुल्क अनुदानापैकी एक टक्का रक्कम नगरपालिकेला थेट अनुदान म्हणून मिळण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी चर्चेदरम्यान सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख यांनी सहभाग घेतला.