ठाणे,२१ – अपयशाला न घाबरता आपले ध्येय गाठण्यासाठी अपार कष्टासोबत प्रत्येकाने देशाप्रती योगदान द्यावे. असा ‘विश्वास’ महाराष्ट्रातील लाखो तरुणांचे आयकॉन अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांनी नविन पिढीच्या मनात जागवला. त्याचबरोबर मोबाईल आणि समाज माध्यमांच्या (सोशल मिडिया) विळख्यात अडकलेल्या नव्या पिढीला या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्या देशातील प्रेरणास्थाने, देशप्रेम, नातेसंबंधाची जाणीव, सामाजिक बांधिलिकी याची जाणीव करून देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
ठाणे पूर्वेतील सुयश कला-क्रीडा मंडळ, श्री सिध्दीविनायक मंदिराच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प शुक्रवारी, विश्वास नांगरे -पाटील यांच्या व्याख्यानाने गुंफले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, मंडळाचे जयदीप कामत, मुधसूदन राव, गजानन पालवे , सतीश सावंत , सुरेश तिवटणे ,गिरीश राजे, हेमंत पवार आदी मान्यवर उपस्थित होते. व्याख्यानमालेच्या प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रथम पुष्प गुंफणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
पोलीस सेवेतील कारकिर्दीचा आढावा घेत,कविता, शेरोशायरीचा चपखल वापर करत नांगरे-पाटील यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.तसेच, त्यांनी छडा लावलेल्या अनेक प्रकरणांच्या तपासाचा उहापोह केला.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा देतांना केलेल्या संघर्षांच्या आठवणी सांगुन आता या स्पर्धा परिक्षेत मराठी मुलांचा टक्का वाढत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.लोकमान्य टिळकांनी उदात्त हेतुने सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केले, मात्र आज या उत्सवाला बिभत्स स्वरूप आले आहे.याविरोधातील आपल्या लढ्याला न्यायालयाचेही समर्थन मिळत असल्याचे सांगुन नांगरे-पाटील यांनी, आपल्याला मुन्नाभाई … सारख्या चित्रपटातून गांधीजींचे तत्वज्ञान कळते.याची खंत वाटत असल्याचे म्हटले. २६-११ च्या हल्ल्यात अतिरेक्यांशी लढतांना केलेल्या व्यूहरचनेबद्दल सांगुन त्यांनी, अपयशाला न घाबरता, नकारात्मक विचार बाजूला ठेवुन विश्वासाने सामोरे जावे. तसेच आपले ध्येय गाठण्यासाठी खूप कष्ट करून देशाप्रती योगदान द्यावे,असा ‘विश्वास’ त्यांनी तरूणाई मध्ये जागवला.
आयुष्याच्या बेरीज-वजाबाकीचा हिशेब ठेवा
भौतीक सुखासाठी आपण गाव सोडुन शहरातील सिमेंट – कॉक्रीटच्या जगात येतो. पण, शहरातील छोट्या घरात आपलाही जीव गुदमरतो.अशी कबुली नांगरे-पाटील यांनी दिली.तसेच,आपण आपल्या जन्मदात्यांना वृध्दाश्रमात ठेवतो, हे चुकीचे असुन आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकांने आपल्या बेरीज – वजाबाकीचा हिशोब ठेवण्याची गरज असल्याचे नमूद केले.