मुंबई, २१ : मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदेतील अटी शर्तीनुसार ज्यांची आर्थिक क्षमता आहे त्यालाच हे काम करता येईल त्यामुळे अडाणी समूहाने ते सिध्द केल्यानंतरच त्यांना कामाचे आदेश देण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.
यासंदर्भातील लक्षवेधी सूचना वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केली होती, त्यावर सुनील केदार, जयंत पाटील यांनी उप प्रश्न विचारले होते. या कामाच्या कंत्राटदाराने विविध विभागांच्या परवानगी घ्यायच्या आहेत त्यापैकी नगर विकासाची परवानगी अद्याप बाकी आहे, अडाणी समूहाच्या खात्यात आवश्यक पैसे जमा आहेत की नाही हे पाहूनच त्यांना कामाचे आदेश देण्यात येतील असं फडणवीस म्हणाले.
रेल्वे विभागाची जागा पैसे देऊन ताब्यात घेतली आहे, त्यामुळेच तिथे आधी पुनर्वसन करून मगच इतर विकास कामे करण्यात येणार आहेत, म्हणूनच कोणत्याही अडचणी येऊन न देता धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्ण केला जाईल, त्यासाठी सुमारे सात वर्षांचा कालावधी लागेल असंही फडणवीस म्हणाले.