Monday, October 26 2020 3:09 pm

धनंजय मुंडे विरोधात कोर्टात गुन्हा दाखल

औरंगाबाद :- ऐन अधिवेशन सुरू होण्याच्या काळात धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहे.  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सरकारी जमीनिवर डल्ला मारल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

बेलखंडी मठाला इनाम म्हणून देण्यात आलेली जमीन धनंजय मुंडे यांनी पदाच्या ताकदीचा वापर करून साखर कारखान्यासाठी विकत घेतली. शेतजमीनही नापीक केली,असा आरोप धनंजय मुंडेंवर करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिले आहेत. सदर गुन्ह्याची याचिका राजाभाऊ फड यांनी दाखल केली होती.

इनाम म्हणून दिल्या गेलेल्या कुठल्याच जमिनीचा खरेदी व्यवहार करता येत नाही. पण धनंजय मुंडे याने दबाव आणून ही जमीन खरेदी केल्याचे राजाभाऊ फड यांनी म्हटलं आहे. याचशिवाय जमीन शेतीयोग्य असताना देखील जाणून बुजून तिला नापीक करुन घेतल्याचंही या याचिकेत म्हटलं आहे. याप्रकरणी याचिकाकर्ते राजाभाऊ फड यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. पण याविरोधात काहिच पाऊले उचलल्यामुळे त्यांनी शेवटी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. औरंगाबाद खंडपीठाने तपासी अंमलदारांवरही ताशेरे ओढले आहेत आणि याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान याबाबतीत सविस्तर वृत्त असे की , धनंजय मुंडे यांनी 1991 साली जगमित्र शुगर फॅक्टरीसाठी 24 एकर जमीन खरेदी केली होती. या खरेदी व्यवहाराविरोधात बर्दापूर पोलीस ठाण्यात राजाभाऊ फड यांनी तक्रार दिली होती. ही जमीन अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील बेलखंडी देवस्थानची आहे.

श्री. गिरी, श्री. देशमुख व श्री. चव्हाण यांच्यात जमिनीवरून वाद होता. त्यामुळे जमिनीच्या विक्रीचे अधिकार श्री. देशमुख व श्री. चव्हाण यांना मिळाले होते. त्यांच्याकडून मुंडे यांनी ही जमीन खरेदी केली होती. पोलिस ठाण्यात तक्रारीची दखल घेतली जात नाही म्हणून फड यांनी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली होती. ही सरकारी जमीन आहे. त्यामुळे ती ट्रस्ट्र किंवा खासगी व्यक्तीला विकत घेता येत नाही, असा आरोप फड यांनी केला होता. त्यामुळे मुंडे यांच्यावर  गुन्हा दाखल करावा, अशी विनंती याचिकेत केली होती. ही विनंती कोर्टाने मान्य केली आहे.

1991 मध्ये सरकारी दप्तरात या जमिनीची नोंद इनामी जमीन म्हणून नव्हती आणि आम्हाला वादाची माहिती नव्हती. विक्री करण्याचा मालकी हक्क श्री. देशमुख यांच्याकडे असल्याने त्यांच्याकडून जमीन खरेदी करण्यात आली, असे मुंडे यांचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी स्पष्ट केलं आहे. केवळ राजकीय द्वेषातून आरोप करण्यात आला असून औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचंही सिद्धेश्वर ठोंबरे यांनी सांगितले.