Thursday, December 5 2024 6:38 am

‘धडपड भाग २’ हे पुस्तक युवकांना प्रेरणा देणारे ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, 24: ‘धडपड भाग २’ या पुस्तकात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या व्यक्तींची यशोगाथा पत्रकार श्याम दौंडकर यांनी रेखाटली असून हे पुस्तक युवकांना प्रेरणा देणारे ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता अजित इंगवले, लेखक श्याम दौंडकर आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, धडपड भाग २ या पुस्तकात शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या विविध क्षेत्रातील १२९ व्यक्तींच्या कार्याचा समावेश आहे. हे पुस्तक वाचनीय असून त्यामध्ये चिकाटी, जिद्द व ध्येय उराशी बाळगून या व्यक्तींनी यश संपादन केल्याचे पाहायला मिळते.

गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या व्यक्तींच्या संघर्ष कथा श्री. दौंडकर यांनी सोप्या भाषेत मांडल्या आहेत. पत्रकार म्हणून त्यांनी जिल्हा परिषद, ग्रामपंचायती येथील समस्यांचा अभ्यास करून त्या योग्यरीतीने मांडल्या आहेत. नागरिकांनी हे पुस्तक अवश्य वाचावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

राज्याच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून श्री.पवार म्हणाले, नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पात शासनाने तरुण-तरुणी, शेतकरी, माता, भगिनी करिता विविध योजना आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. येत्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेतील लाभार्थ्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे प्रत्येकी ३ हजार रुपयांच्या लाभाचे वितरण केले जाईल.

महिलांना समृद्ध करणे, त्यांना आत्मबल देणे हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. कुटुंबाचे ८ लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या मुलींना मोफत शिक्षण देण्यात येत आहे. गरीब व होतकरू लाभार्थ्यांना याचा लाभ होईल. योजना राबविताना त्यात सातत्य राहावे यासाठी भरीव तरतूद केली आहे. विविध लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या व्यक्तींचा सत्कारही करण्यात आला.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी ‘चला जगाचा प्रवास करूया’ या सुनिता निराळे यांच्या वाहनाची पाहणी केली.

पीडीसीसी बँकेच्या नूतनीकृत शाखेचे लोकार्पण

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी मर्यादित बँकेच्या (पीडीसीसी) नूतनीकृत जिल्हा परिषद शाखेचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी आमदार अतुल बेनके, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक दत्तात्रय येळे, प्रदिप कंद, प्रविण शिंदे, सुरेश घुले, कु. पूजा बुट्टेपाटील, निर्मला जागडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, शाखा व्यवस्थापक प्रतिभा ऊभे आदी उपस्थित होते.