मुंबई, 11 : निव्वळ मनोरंजन न करता सामाजिक आशय असणाऱ्या प्रभावी चित्रपटांची निर्मिती हे मराठी चित्रपटांचे बलस्थान आहे. यामुळेच मराठी चित्रपटांचे विषय हे इतर भाषिक चित्रपटांपेक्षा नेहमी वेगळे असतात. विषयांचे वैविध्य असलेल्या मराठी चित्रपटांमध्ये सामाजिक विषयांवर भाष्य करणारे अनेक चित्रपट आजवर येऊन गेले आहेत. आता अवयवदान हा गंभीर विषय हलक्या फुलक्या पद्धतीने मांडण्या प्रयत्न एका मराठी चित्रपटातून करण्यात आला आहे. ‘8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी!’असे या चित्रपटाचे नाव आहे. .
निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे आणि सुधीर कोलते यांनी ‘8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी!’ या चित्रपटाची निर्माती केली आहे, तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. शर्वाणी – सुश्रुत यांनी चित्रपटाची पटकथा लिहीली आहे, तर संजय मोने यांनी संवाद लेखन केले आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्यासह शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे – विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी पुष्कर श्रोत्री यांच्या चित्रपटात भूमिका आहेत. वैभव जोशी यांनी या चित्रपटातील गाणी लिहीली आहेत. अवधूत गुप्ते यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाने 90 पेक्षाही जास्त पुरस्कार मिळवले आहेत.
‘8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी!’ हा चित्रपट देहदानासारख्या महत्त्वाच्या विषयावर भाष्य करतो. देहदान केल्यास मृत्यूनंतर आपले अवयव इतर गरजू रुग्णांच्या कामी येऊ शकतात, हा विचार चित्रपटात रंजक पद्धतीनं मांडल्याचे चित्रपटाच्या ट्रेलरमधून दिसते. त्याशिवाय वैद्यकीय शिक्षणावरही यामध्ये भाष्य करण्यात आले आहे.