Tuesday, November 12 2024 11:15 am

देशांतर्गत पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांशी संवाद वाढवण्यासाठी ‘ओटीएम’ प्रदर्शनी – चंद्रशेखर जयस्वाल

मुंबई, 9: देशांतर्गत पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांशी संवाद वाढवण्यासाठी ‘ओटीएम’ प्रदर्शनी महत्त्वाची भूमिका बजावेल. राज्यातील पर्यटन क्षेत्रातील 40 उद्योजक या ट्रॅव्हल मार्टमध्ये सहभागी झाले आहेत, असे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी सांगितले.

जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बी.के.सी.येथे आजपासून तीन दिवस आऊट बाऊंड ट्रॅव्हल मार्ट (ओ. टी. एम.) मार्फत पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांचा सहभाग असलेल्या प्रदर्शनीचे उद्घाटन करताना श्री.जयस्वाल बोलत होते. यावेळी पर्यटन संचालनालयाचे कोकण विभागीय पर्यटन उपसंचालक हनुमंत हेडे उपस्थित होते.

श्री.जयस्वाल म्हणाले की, या प्रदर्शनीमध्ये देशातील प्रत्येक राज्यातील पर्यटन क्षेत्रातील ट्रॅव्हल एजन्सी, रिसॉर्ट, विविध पर्यटन संस्थांची माहिती असलेले माहितीपूर्ण स्टॉल आहेत. देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी इतर राज्यातील पर्यटन क्षेत्रातील विविध उद्योजकांशी चर्चा करता येईल. पर्यटन क्षेत्रात इतर राज्यांनी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम संवादातून समजतील, इतर राज्यांच्या पर्यटन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन राज्यातील पर्यटन वाढीसाठी त्याचा नक्कीच लाभ होईल.

राज्यातील पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांना ‘ओटीएम’ प्रदर्शनीच्या माध्यमातून स्थानिक पर्यटनाची माहिती देशपातळीवर नेता येईल.