Tuesday, July 7 2020 2:26 am

देवेंद्र फडणवीस यांची विधानसभा विरोधीपक्ष नेतेपदी निवड

मुंबई : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याची घोषणा रविवारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात केली. त्यानंतर सभागृहाचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे अभिनंदन केले.

पटोले म्हणाले, “विधानसभेतील विरोधी पक्ष नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मान्यता देण्यात यावी अशी विनंती भाजपाने आपल्याकडे केली आहे. त्यामुळे अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मी भाजपाला मान्यता देत आहे. तसेच भाजपाने गटनेते देवेंद्र फडणवीस हे १ डिसेंबर २०१९ पासून विरोधी पक्ष नेते असतील असे मी जाहीर करतो.”

दरम्यान, फडणवीस यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, या दिवसाची मला अपेक्ष नव्हती, मी इथं येईन अस कधीही म्हटलं नव्हत पण आलो, अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला. “आज मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, २५ ते ३० वर्षे जे आमच्या विरोधात होते ते मित्र झालेत तर जे मित्र होते ते आज विरोधात बसलेत. फडणवीसांशी असलेली मैत्री आपण कधीही लपवलेली नाही त्यांच्याकडून मी ५ वर्षांत बरचं काही शिकलो. कुठलीही गोष्ट मी काळोखात केली नाही. पदावर बसून न्याय देऊ शकलो नाही तर मी अपराधी, असेन” असेही यावेळी ठाकरे म्हणाले.

“फडणवीसांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड योग्य. ते एक अभ्यासून नेते आहेत. गेली ५ वर्षे त्यांनी चांगलं काम केलं. एखादा विषय समजून घेऊन प्रश्न सोडवले. सैन्याला आत्मविश्वास वाटावा यासाठी मी पुन्हा येईन असं त्यांनी सांगितलं. पण मी कुठे बसेन हे त्यांनी सांगितलं नव्हतं” अशा शब्दांत जयंत पाटील यांनी फडणवीसांचे अभिनंदन करताना कोटी केली.