Monday, June 17 2019 4:14 am

दुसरे लग्न ‘बेकायदेशीर परंतु, त्यातून जन्मलेलं अपत्य कायदेशीर.

नवी दिल्ली-: हिंदू विवाह कायद्याने दोन लग्न करण्यास मनाई केलेली आहे. त्यानुसार दुसरे लग्न ‘बेकायदा’ असले तरी त्यातून जन्मलेले अपत्य मात्र ‘कायदेशीर’च असते. असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.रेल्वेकडे अनुकंपा तत्त्वावर नोकरी मागणाऱया एका मृत रेल्वे कर्मचाऱयाच्या मुलास नोकरी देण्याबाबत येत्या तीन महिन्यांत निर्णय घ्या, असे निर्देश न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने दिले. मुंबई उच्च न्यायालयाने आधी दिलेला निकाल कायम ठेवून त्या खंडपीठाने केंद्र सरकारचा आव्हान अर्ज फेटाळून लावला.

पहिला विवाह अबाधित असताना दुसरा विवाह अमान्य आहे. मात्र दुसऱया विवाहातून जन्मलेले मूल हे वैध आहे, असे स्पष्ट करीत मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वेने अनुकंपा तत्त्वावर मुकेशला नोकरी देण्याचा विचार करावा. पण या निकालास केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले.

सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल कायम केला. शिवाय अशा मुलांचे रक्षण करण्यासाठीच हिंदू विवाह कायद्यामधील 16(1) हे कलम आहे. कलम 16(1) नुसार दुसरा विवाह बेकायदेशीर आहे. मात्र अशा विवाहातून झालेले मूल हे वैध आहे, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.

अखेर काय आहे हे प्रकरण?

केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालास सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. या आव्हान याचिकेत केंद्र सरकारने मुकेश कुमार (बदललेले नाव) याला प्रतिवादी करण्यात आले. मुकेशचे वडील रेल्वेमध्ये नोकरीला होते. मुकेश हा वडिलांच्या दुसऱया पत्नीपासून झालेला मुलगा आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर मुकेशने अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात यावी असा अर्ज केला. परंतु त्याचा अर्ज रेल्वेने फेटाळला. मात्र केंद्रीय प्रशासकीय लवादाने मुकेशच्या बाजूने निकाल दिला. यानंतर हे प्रकरण मुंबई हायकोर्टात गेले.