Tuesday, July 23 2019 2:10 am

दुर्मिळ जातीचे खवल्या मांजर ची तस्करी करणारी टोळी गजाआड

ठाणे : खवले मांजर विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा तस्करांना ठाणे गुन्हे मध्यवर्ती शाखेच्या पथकाने मंगळवारी डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली. सागर मारुती पवार (वय-33, राहणार-साई मल्हार बिल्डिंग, रूम नंबर 209, फुलपाडा, प्रथमेशनगर, विरार) आणि अब्दुल जलील युनूस महामृत (54, राहणार- मु. पो. साई, ता. माणगाव, जिल्हा -रायगड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तस्कराकडून जिवंत खवले मांजर हस्तगत करण्यात आले आहे. या खवले मांजराची किंमत 40 लाख रुपये असून खवले मांजराला वनविभागाच्या हवाली करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.

डायघर येथील मुंब्रा पनवेल रस्त्यावरील दहिसर येथे काही व्यक्ती वन्यप्राणांची विक्री करण्यास येणार असल्याची माहिती गुन्हे मध्यवर्ती शाखेचे पोलीस हवालदार शरद तायडे यांना मिळाली होती. या माहितीनुसार पथकाने मंगळवारी दुपारी सदर ठिकाणी सापळा लावून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे असलेल्या एका काळ्या रंगाच्या सॅक मध्ये गोणपाटात गुंडाळले व तोंडात एकही दात नसलेला आणि मुंग्या, अळया खाऊन जगणारा दुर्मिळ सस्तन प्राणी खवले मांजर त्यांच्याकडे आढळून आला. चौकशीत हे खवले मांजर 40 लाख रुपयात विकण्यासाठी आणले असल्याचे उघडकीस आले. हे खवले मांजर कोण खरेदी करणार होते व अटकेतल्या आरोपींनी ते कोठून आणले होते याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली .