Monday, May 12 2025 5:20 pm

दुय्यम निबंधक कार्यालये मार्च अखेरीस येणाऱ्या सुट्यांच्या दिवशीही सुरू राहणार

ठाणे,28 : नोंदणी व मुद्रांक विभागाने मार्च अखेरीस येणाऱ्या दि.२९, ३० व ३१ मार्च २०२४ रोजी असणाऱ्या सार्वजनिक सुट्टयांच्या दिवशीही जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक व सह दुय्यम निबंधक कार्यालये दस्त नोंदणीसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसा आदेश दि.१९ मार्च २०२४ रोजी नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे श्री. हिरालाल सोनावणे यांनी दि.१९ मार्च २०२४ रोजी पारित केला आहे.
दरवर्षी मार्चअखेरीस आर्थिक वर्ष संपत असल्याने जनतेकडून मार्चअखेर सुट्ट्या आल्यामुळे जनतेस त्यांचे दस्त नोंदणीसाठी त्रास होऊ नये, याचा विचार करुन नोंदणी महानिरीक्षक,पुणे यांनी हा स्तुत्य निर्णय घेतला आहे. तसेच रेडिरेकनर दरात १ एप्रिल पासून वाढ संभवते, त्यामुळे मार्चअखेर गर्दी होते. सुट्टीच्या दिवशी नोंदणी कार्यालय सुरू राहणार असल्यामुळे जनतेची यातून सोय होणार आहे.
स्थावर मिळकतीचे व्यवहार पूर्ण करून, मुद्रांक शुल्क भरुन खरेदी दस्तांची नोंदणी मोठ्या प्रमाणात केली जात असते. दरवर्षी प्रमाणे यावर्षीदेखील दि. १ एप्रिल २०२४ पासून स्थावर मिळकतीच्या रेडिरेकनरच्या दरात गेल्या दोन-तीन वर्षापासून वाढ झाली नसल्याने यावर्षी रेडिरेकनरच्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे मार्च २०२४ अखेरीस मोठ्या प्रमाणात मुद्रांक शुल्क भरुन दस्त नोंदणी होण्याची अपेक्षा नोंदणी विभाग व्यक्त करीत आहे व तसा अंदाज या क्षेत्रातील तज्ञांकडून देखील व्यक्त होत आहे.
या कारणामुळे यावर्षी मार्च अखेरीस येणाऱ्या वर नमूद सुट्ट्यांच्या दिवशी देखील ठाणे जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक व सहदुय्यम निबंधक कार्यालये दस्त नोंदणी करण्यासाठी जनतेच्या सेवेत सुरू ठेवण्याचा निर्णय नोंदणी विभागाने घेतला असल्याचे व जनतेने या सुवर्णसंधीचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा व आपल्या दस्तांची नोंदणी मुद्रांक शुल्क भरुन करावी, असे आवाहन जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी (शहर) नारायण राजपूत आणि सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी (ग्रामीण) ओमप्रकाश जांभळे यांनी जनतेला केले आहे.