Thursday, November 21 2019 4:39 am

दिल्लीत सोनिया गांधी व राहुल गांधी यांचे धरणे आंदोलन

नवी दिल्ली :-  कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार खरेदी करून कर्नाटक सरकार पाडण्याचा कट भारतीय जनता पक्ष करत आहे, असा थेट आरोप काँग्रेसने केला आहे. कर्नाटकात निर्माण झालेल्या परिस्थितीला विरोध म्हणून काँग्रेसने संसद परिसरात धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे इतर मोठे नेतेही सहभागी झाले आहेत.

कर्नाटक बरोबरच गोव्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवरही काँग्रेसने आक्रमक होताना दिसत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात काँग्रेसने कर्नाटक आणि गोव्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीला विरोध करण्याची रणनीती आखली आहे. संसद परिसरात धरणं देतं राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच गोवा आणि कर्नाटकातील राजकीय परिस्थितीला भाजप जबाबदार असल्याने त्याचा निषेध करण्यासाठीच आम्ही निदर्शने करत असल्याचं राहुल यांनी सांगितलं.

 गोव्यातील काँग्रेसच्या १५ आमदारांपैकी भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पाडत विरोधी पक्षनेते चंद्रकांत कावळेकर यांच्या नेतृत्वात  १० आमदारांना आपल्या पक्षात घेतले आहे. या घडामोडीनंतर आता काँग्रेसकडे केवळ ५ आमदार उरले आहेत. गोव्यातील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मतभेद असून विरोधी पक्षांच्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये विकासकामे होत नसल्यानेच काँग्रेस पक्षात फूट पडल्याचे कावळेकर यांचे म्हणणे आहे. गोव्यातील या घडामोडीनंतर गोवा विधानसभेत भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संख्या आता १७ वरून २७ इतकी झाली आहे. तर, कर्नाटकात बुधवारी काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचे बंडखोर आमदार अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात गेले. अशात विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने राज्यपाल वजुभाई वाला यांना एच. डी. कुमारस्वामी सरकारला शक्ती परीक्षण करण्याचे निर्देश देण्याचा आग्रह केला. दरम्यान, एम. टी. बी. नागराज आणि डी. सुधाकर या कर्नाटक काँग्रेसच्या दोन आमदारांनी आपले राजीनामे सुपूर्द केले आहेत. या बरोबर १ जुलैपासून राजीनामे देणाऱ्या आमदारांची संख्या १३ वर पोहोचली आहे. आमदारांनी दिलेले राजीनामे स्वीकारले गेल्यास विधानसभेत अध्यक्षांसह पक्षाचे बळ ७९ वरून घटून ते ६६ वर येणार आहे.