पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश
मुंबई.१३ : दापचरी येथे दुग्ध प्रकल्पाच्या ठिकाणी अतिक्रमण वाढले आहे. दुग्ध प्रकल्पाची जमीन अतिक्रमित झाल्याने दुग्ध व्यवसाय विकास, महसूल, भूमि अभिलेखच्या संबंधित अधिकाऱ्यांनी १५ मे २०२३ पर्यंत संपूर्ण जमिनीचा सर्व्हे करून मोजणी करण्याचे निर्देश पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.
मंत्रालयात दुग्ध व्यवसाय विकास आढावा बैठकीत मंत्री श्री. विखे-पाटील बोलत होते. बैठकीला पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, दुग्ध विकास आयुक्त डॉ. श्रीकांत शिरपूरकर, पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले की, दापेचरीमध्ये मुंबईतील तबेले आणून येथे स्वतंत्र दुग्ध प्रकल्प करण्याचा शासनाचा विचार होता. यासाठी सुमारे ६६१५ एकर जमिनीचे भूसंपादन झाले होते. याठिकाणी तबेलेही करण्यात आले होते. एक स्वतंत्र धरणही बांधण्यात आले होते. मात्र त्या जागेचा वापर कधी झाला नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी त्याठिकाणचे अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस, स्थानिक लोकप्रतिनिधी यांची मदत घ्यावी. जादा मनुष्यबळाची आवश्यकता भासल्यास देण्यात येईल. याठिकाणच्या दिशा, नकाशा ठरविण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करणे अत्यंत महत्वाचे असल्याने यासाठी पूर्णवेळ अधिकारी नेमून काम करावे.
तबेल्याव्यतिरिक्त अतिक्रमित जागा, आरे दूध डेअरी परिसरातील अतिक्रमण, झोपड्या हटविण्यासाठी अतिक्रमण आणि पोलीस पथकाची नेमणूक करण्याच्या सूचनाही श्री. विखे-पाटील यांनी दिल्या.
दापचरी येथील प्रकल्पाच्या ठिकाणी २५० कंट्रोल मार्क केले असून ३० एप्रिलपर्यंत ड्रोन सर्व्हे पूर्ण होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.