ठाणे, 08 :- दहीहंडी उत्सव / प्रो-गोविंदा लीग मधील सहभागी गोविंदांना मानवी मनोरे रचताना अपघात/दूर्घटना होण्याची शक्यता असते. काही वेळा गोविंदा पथकातील गोविंदाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू घडून येतो किंवा गंभीर दुखापत होऊन जीवाला धोका निर्माण होतो. परिणामी अपघातग्रस्त गोविंदाना व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. यानुषंगाने गोविंदाना विमा संरक्षण देण्यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून ५० हजार गोविंदांना प्रति गोविंदा रु.७५/- चा विमा हप्ता याप्रमाणे एकूण रु.३७ लाख ५० हजार इतका निधी संबंधित विमा कंपनीस अदा करण्यासाठी दहीहंडी समन्वय समिती (महा) या संस्थेस वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
या योजनेंतर्गत विमा संरक्षणाचे स्वरूप पुढीलप्रमाणे राहील :- अपघाती मृत्यू विमा संरक्षण – रु.१०,००,००० (रु. दहा लक्ष), दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास विमा संरक्षण – रु.१०,००,०००(रु. दहा लक्ष), एक हात एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास विमा संरक्षण – रु.५,००,०००(रु. पाच लक्ष), कायमस्वरुपी पूर्ण अपंगत्व (Permanent total disablement) विमा संरक्षण – रु.१०,००,००० (रु. दहा लक्ष), कायम अपूर्ण/पक्षपाती अपंगत्व (Permanent partial disablement) विमा संरक्षण – विमा पॉलिसीमध्ये नमूद करण्यात आलेल्या टक्केवारी नुसार. अपघातामुळे रुग्णालयीन खर्च विमा संरक्षण – प्रत्यक्षात झालेला खर्च किंवा जास्तीत जास्त रु.१,००,०००/- (एक लक्ष).
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने याबाबतचा शासन निर्णय दि. 18 ऑगस्ट 2023 रोजी जारी केला असून महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 202308181630295321 या क्रमांकाने उपलब्ध करुन दिला आहे. विमा संरक्षणाचा कालावधी हा या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ते दि. 8 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत राहील, असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.