Tuesday, December 10 2024 8:28 am

थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत आवाहन

ठाणे 2 :- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग समाज व त्यातील 12 पोटजाती-मांग, मातंग, मिनीमादीग, मादींग, दानखणी मांग, मांगमहाशी, मदारी, राधेमांग, मांग गारोडी, मादगी, मादिगा या पोटजातीतील 18 ते 50 या वयोगटातील दारिद्रय रेषेखालील (वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 3,00,000/- पर्यंत) बेरोजगारांकरिता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्जयोजना राबविण्यात येतात.
शासन निर्णय क्र. एलएएस- 2022 / प्र.क्र.94/महामंडळे, दि. 4 नोव्हेंबर 2022 अन्वये रु. 1,00,000/- प्रकल्प मर्यादेची थेट कर्ज योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ठाणे जिल्हयाकरिता 50 चे भौतिक उद्दिष्ट (50 % पुरुष व 50% महिला) देण्यात आलेले आहे. यामध्ये ग्रामीण भागासाठी प्राधान्य राहील. तसेच राज्यस्तरावरील क्रीडा पुरस्कार प्राप्त व्यक्तींना तसेच सैन्यदलातील वीरगती प्राप्त वारसापैकी एका सदस्यास प्राधान्याने लाभ देण्यात येईल.
थेट कर्ज योजनेचे अर्ज जिल्हा कार्यालयात दि. 18 जुलै 2023 पासून विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. या कर्ज अर्जाकरिता ठाणे जिल्हयातील खालील नमूद केलेल्या पात्रता व अटी/शर्ती व निकषांची पूर्तता करणारा अर्जदार पात्र राहील.
अशा अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसह कर्ज अर्ज भरणा करुन कार्यालयास सादर करण्याची अंतिम मुदत दि. 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
1) अर्जदार महाराष्ट राज्याचा रहिवासी असावा. 2) मातंग समाज व त्यातील 12 पोटजातीतील असावा. 3) अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष असावे. 4) अर्जदाराचा सिबील क्रेडीट स्कोअर 500 असावा. 5) अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. 6) अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. 3,00,000/- यापेक्षा जास्त नसावे. 7) एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल. 8) व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव / प्रशिक्षित असावा. 9) महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार व्यवसायास अनुरुप असलेली आवश्यक ती कागदपत्रे/ प्रमाणपत्रे/ करारपत्रे/ कर्जमागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
कर्जप्रस्ताव सादर केल्यानंतर महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार मंजूरी संदर्भातील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. कर्जप्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून दि. 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत इच्छुक अर्जदारांनी महामंडळाच्या ठाणे येथील जिल्हा कार्यालयाच्या खालील पत्त्यावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत कर्ज मागणी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जिल्हाधिकारी कार्यालय, 5 वा मजला, कोर्ट नाका, ठाणे 400601 दूरध्वनी क्र. 022-25388413 यांनी केले आहे.